Wed, Jul 24, 2019 14:12होमपेज › Pune › जिल्ह्यातील 9 हजार शेतकर्‍यांना मिळणार लाभ

जिल्ह्यातील 9 हजार शेतकर्‍यांना मिळणार लाभ

Published On: Mar 05 2018 1:56AM | Last Updated: Mar 05 2018 12:57AMपुणे  : प्रतिनिधी

जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाकडून राबविण्यात येणार्‍या विविध वैयक्तिक लाभाच्या योजनांसाठी तब्बल 11 हजार 464 प्रस्ताव प्राप्‍त झाले आहेत. त्यापैकी 8 हजार 916 लाभार्थ्यांना योजनांचा लाभ देण्यात येणार आहे. तर उर्वरित 2 हजार 551 जणांना लाभापासून वंचित राहावे लागणार आहे. दरम्यान वस्तू खरेदीची मुदत संपली असून खरेदी पावत्या जमा करण्याचे काम अंतिम टप्प्यात आहे. जिल्हा परिषदेच्या अंदाजपत्रकात कृषी विभागाच्या विविध योजना राबविण्यासाठी 7 कोटी 32 लाखांची तरतूद करण्यात आली हेाती. त्यानुसार 75 टक्के अनुदानावर योजना राबविताना लाभार्थ्यांना प्लास्टिक के्रट्सचा पुरवठा करणे, कडबाकुट्टी यंत्र, ताडपत्री, पीक संरक्षण औजारे, सिंचनासाठी पी. व्ही. सी. पाईप, तणनाशक औषधांचा पुरवठा करणे, ऑईल पंप, इलेक्ट्रॉनिक मोटार संच, सुधारित अवजारे, मोती शेती प्रक्रिया आणि प्रशिक्षण योजनांचा समावेश करण्यात आला आहे.

जिल्ह्यातील शेतकर्‍यांना प्रत्येकी 12 प्लास्टिक क्रेट्सचा पुरवठा करण्यासाठी 2 हजार 40 रुपयांचे अनुदान देण्याचे निश्‍चित करण्यात आले आहे. त्यासाठी 494 लाभार्थ्यांची निवड करण्यात आली आहे. कडबाकुट्टी यंत्रासाठी 17 हजार 530 रुपयांचे अनुदान देण्यात येणार आहे. त्यासाठी 2 हजार 290 प्रस्ताव जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाकडे प्राप्‍त झाले आहेत. त्यापैकी सदस्यांनी प्राधान्य दिलेल्या 1 हजार 66 जणांना कडबाकुट्टी यंत्राचा लाभ देण्यात येणार आहे. कृषी विभागाकडून शेतकर्‍यांना ताडपत्री देण्यासाठी 1 हजार 633 लाभार्थ्यांना प्रत्येकी 2 हजार 325 रुपयांचे अनुदान दिले जाणार आहे. तसेच बॅटरीवर चालणार्‍या स्प्रे पंपच्या 488 लाभार्थ्यांना प्रत्येकी 3 हजार 70 रुपयांचा लाभ देणार आहे.

तर एच. टी. पी. स्प्रेपंप ऑईल इंजिनसह देण्यासाठी 31 लाभार्थ्यांना प्रत्येकी 16 हजारांचे अनुदान खात्यावर वितरित करण्यात येणार आहे. सिंचनासाठी पीव्हीसी पाईपचा पुरवठा करण्यासाठी 1 हजार 669 लाभार्थ्यांना अनुदान वितरित केले जाणार आहे. तर इलेक्टॉनिक तीन ते सात एच.पी. मोटार संच देण्यासाठी 1 हजार 96 जणांना लाभ देण्यात येणार आहे. त्यामध्ये दोन एच.पी. मोटारसाठी 11 हजार 100, तीन एच. पी.साठी 12 हजार 990, पाच एच. पी.साठी 15 हजार 750 तर साडेसात एच. पी.साठी 20 हजार 870 रुपयांचे अनुदान दिले जाणार आहे.