Mon, Mar 25, 2019 18:01होमपेज › Pune › सोन्या काळभोरला जबर मारहाण

सोन्या काळभोरला जबर मारहाण

Published On: Dec 11 2017 1:33AM | Last Updated: Dec 11 2017 12:31AM

बुकमार्क करा

पुणे : प्रतिनिधी

पिंपरी-चिंचवड परिसरातील महाकाली टोळीचा प्रमुख कुख्यात गुन्हेगार सोन्या काळभोरला येरवडा कारागृहात तिघांनी जबर मारहाण केल्याची घटना उघडकीस आली आहे. शनिवारी दुपारी हा प्रकार घडला असून, या प्रकरणी येरवडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यात सोन्या काळभोर जखमी झाला आहे.  दशरथ राजकुमार वाघमोडे, उत्तम प्रकाश गाढवे आणि गोट्या ऊर्फ सुमेद लहू गायकवाड यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस शिपाई शिवाजी वाघमोडे (वय 50) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार, तिघांवर येरवडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  पिंपरी-चिंचवड परिसरात सध्या रावण टोळी आणि महाकाली टोळी युद्ध भडकले आहे; त्यामुळे अचानक दोन टोळ्यांमधील वाद विकोपाला गेला आहे.

दहशत बसविण्यासाठी वाहनांची तोडफोड करून एकमेकांचे मुडदे पाडले जात आहेत. कुख्यात गुन्हेगार सोन्या काळभोर याने रावण टोळीचा म्होरक्या सराईत गुन्हेगार अनिकेत राजू जाधव (वय 22, रा. जाधव वस्ती, रावेत) याचा तलवारीने वार करून; तसेच डोक्यात दगड घालून निर्घृण खून केला होता. त्यानंतर टोळीमध्ये आणखीनच वाद सुरू झाले. या खुनाचा बदला घेण्यासाठी रावण टोळीतील दोघांनी सोन्या काळभोरवर गोळीबारही केला होता. दरम्यान, सोन्या काळभोर आणि त्याच्या इतर साथीदारांना निगडी पोलिसांनी अनिकेत जाधव याच्या खूनप्रकरणी अटक केली होती.

त्यानंतर सोन्या काळभोरला खून प्रकरणात न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. दोन दिवसांपूर्वी येरवडा मध्यवर्ती कारागृहात त्याची रवानगी करण्यात आली आहे. दरम्यान, मृत अनिकेत जाधव याचा मावसभाऊ आणि इतर दोघे एका गुन्ह्यात येरवडा कारागृहात आहेत. त्यामुळे तिघांनी सोन्या काळभोरवर या रागातून हल्ला केल्याचे समोर आले आहे.  दरम्यान, फिर्यादी हे शनिवारी दुपारी सव्वातीनच्या सुमारास वॉर्डातील बंदींना बाहेर सोडत होते. त्या वेळी बराकीच्या समोरून बाहेर पडत असताना तिघांनी सोन्या काळभोरवर अचानक हल्ला केला.

तू माझा मावसभाऊ अनिकेत जाधव याचा खून केला, असे म्हणत मारहाण करण्यास सुरुवात केली. त्या वेळी दशरथ वाघमोडे याने प्लास्टिकची बादली डोक्यात घातली; तर उत्तम गाढवे याने तेथील दगड उचलून सोन्या काळभोरच्या डोक्यात घातला. यात सोन्या काळभोर गंभीर जखमी झाला आहे. दरम्यान, फिर्यादी यांनी तत्काळ धाव घेतली आणि भांडण सोडवले. दरम्यान, यात सोन्या काळभोर गंभीर जखमी झाला आहे. फिर्यादींनी वरिष्ठांना घटनेची माहिती दिली. त्यानंतर रात्री उशिरा येरवडा पोलिस ठाण्यात तिघांवर गुन्हा दाखल केला. या प्रकरणी अधिक तपास येरवडा पोलिस करीत आहेत.