Tue, Apr 23, 2019 19:32होमपेज › Pune › ‘यशवंत’च्या दोषी संचालकांच्या वसुलीस तात्पुरती स्थगिती

‘यशवंत’च्या दोषी संचालकांच्या वसुलीस तात्पुरती स्थगिती

Published On: Dec 12 2017 2:08AM | Last Updated: Dec 12 2017 1:26AM

बुकमार्क करा

पुणे ः प्रतिनिधी

थेऊर येथील यशवंत सहकारी साखर कारखान्याच्या आर्थिक नुकसानीस जबाबदार असलेल्या तत्कालीन दोषी संचालकांवरील कलम 88 च्या कारवाईचा स्थगिती आदेश सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी 8 डिसेंबर रोजी उठविला. त्यामुळे संचालकांकडून व्याजासह नुकसानीची 13 कोटी 13 लाख रुपयांची वसुलीची कारवाई अपेक्षित होती. त्यावर कारखान्याचे अशोक काळभोर आणि अन्य संचालकांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली. त्यांनी दाखल केलेल्या अपिलावर न्यायालयाने तात्पुरता स्थगिती आदेश दिलेला असून पुढील सुनावणी 19 डिसेंबरला ठेवण्यात आलेली आहे.
कारखान्याच्या तत्कालीन संचालकांवर आर्थिक नुकसानीची जबाबदारी निश्‍चित करण्यात आली होती.

सहकार कायद्यातील कलम 88 च्या दिनांक 10 डिसेंबर 2014 रोजीच्या आदेशानुसार संबंधित दोषी संचालकांकडून कारखान्यास साखर निर्यात विक्री, अल्कोहोल विक्री आणि बारदान खरेदी आदींमधून कारखान्यास नुकसान झाल्याचा ठपका ठेवण्यात आला होता. त्यावर सहकार मंत्र्यांकडे अपिल दाखल करण्यात आले होते. त्यानुसार दि. 10 फेब्रुवारी 2015 रोजी देण्यात आलेला स्थगिती आदेश विद्यमान सहकार मंत्र्यांनी उठविल्यानंतर अहवालानुसार कारवाई अपेक्षित होती. त्यानुसार पुणे प्रादेशिक साखर सह संचालकांकडून दोषी संचालकांच्या स्थावर आणि जंगम मालमत्तांवर टाच आणून 
रक्कम वसूली करण्याची कारवाई अपेक्षित होती. 

दरम्यान, सहकार मंत्र्यांचा 8 नोव्हेंबरचा आदेश कारखाना संचालकांना 22 नोव्हेंबर रोजी मिळाला आहे. तसेच कारवाईचा अहवाल देताना सहकार कायद्यातील नियम 72 अन्वये कायदेशीर प्रक्रिया राबविण्यात आलेली नसल्याचे म्हणणे अपिलकर्त्यांनी न्यायालयासमोर मांडले आहे. त्यावर मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती एम. एस. संकलेचा यांनी अपिलावर तात्पुरता स्थगिती आदेश दिलेला आहे. त्यामुळे यशवंतच्या संचालकांना काही काळापुरता दिलासा मिळाला आहे.