Sat, Apr 20, 2019 09:54होमपेज › Pune › मेट्रो प्रकल्पाचे काम वेगाने सुरू

मेट्रो प्रकल्पाचे काम वेगाने सुरू

Published On: Jan 24 2018 1:47AM | Last Updated: Jan 24 2018 1:26AMपुणे : प्रतिनिधी 

मागील वर्षी 23, जानेवारी 2017 रोजी महामेट्रोच्या वतीने पुणे आणि पिंपरी चिंचवड परिसरात उभारण्यात येणार्‍या पुणे मेट्रो रेल्वे प्रकल्पाच्या कामाला सुरुवात झाली होती. गेल्या वर्षभरात या प्रकल्पाच्या कामाची प्रगती ही समाधानकारक असून, येत्या काहीर महिन्यात या प्रकल्पाचा वेग आणखी वाढेल असे प्रतिपादन महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. ब्रिजेश दीक्षित यांनी केले. 
मेट्रो प्रकल्पाच्या कामांना सुरू होऊन एक वर्ष झाल्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत डॉ. दीक्षित बोलत होते. महामेट्रोचे कार्यकारी संचालक रामनाथ सुब्रमण्यम, तांत्रिक सल्लागार शशिकांत लिमये आदी यावेळी उपस्थित होते.

यावेळी बोलताना डॉ. दीक्षित म्हणाले की, पुणे आणि पिंपरी चिंचवड परिसरात होत असलेल्या मेट्रो प्रकल्पाच्या कामात रिच 1 अर्थात पीसीएमसी ते रेंज हिल्स (10.795 किमी) या मार्गिकेचा समावेश आहे. प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यात या मार्गिकेदरम्यान मेट्रो प्रकल्पाच्या व्हाया ड्क्ट भागाचे काम सुरू असून या संदर्भातील निविदा हा एनसीसी लिमिटेड या कंपनीला देण्यात आला आहे. सदर मार्गिकेदरम्यान पीसीएमसी ते हॅरिस पुला दरम्यान मेट्रो प्रकल्पाचे काम हे वेगाने सुरू आहे. याबरोबरच आजपर्यंत पीसीएमसी ते रेंज हिल्स मार्गिकेदरम्यान 75 फुटिंग्स, 32 पियर्स, 10 पिअर कॅप आणि 102 कास्टेड सेगमेंट तयार झाले आहेत, अशीही माहिती डॉ. दीक्षित त्यांनी यावेळी दिली.

 ते पुढे म्हणाले की, मेट्रो प्रकल्पाच्या उन्नत स्थानकांचे काम हे अल फारा’ ए (जेव्ही) या कंपनीला देण्यात आले असून रिच 1 या मार्गिके दरम्यान 9 उन्नत स्थानके असणार आहेत. या प्रत्येक स्थानकाची लांबी ही 140 मी आणि रुंदी 21 मी इतकी असेल. आज पर्यंत संत तुकारामनगर ,कासारवाडी, फुगेवाडी, दापोडी आणि बोपोडी या ठिकाणी मेट्रो प्रकल्पाच्या कामाला सुरुवात झाली असून संत तुकारामनगर ,कासारवाडी, फुगेवाडी, दापोडी या स्थानकांच्या येथे जिओ टेक्निकल सर्व्हेक्षण पूर्ण झाले आहे.

चित्रकला आणि निंबध स्पर्धांचे आयोजन

पुणे मेट्रो प्रकल्पाच्या कामाची सुरुवात होऊन एक वर्ष पूर्ण झाले आहे. या वर्धापन दिनानिमित्त पिंपरी चिंचवड परिसरातील हिंदुस्थान अँटिबायोटिक्स येथील शाळा, खराळवाडी माध्यमिक विद्यालय या ठिकाणी व पुणे शहरातील नेताजी सुभाषचंद्र बोस या शाळेमध्ये चित्रकला आणि निंबध स्पर्धांचे आयोजन मेट्रोच्या वतीने करण्यात आले होते. सदर स्पर्धेच्या विजेत्यांनाही यावेळी पारितोषिके प्रदान करण्यात आली. याशिवाय फेसबुक , ट्विटर प्रत्येकी पाच फॉलोवर्स आणि दोन व्हिसाल ब्लोवर यांना सुद्धा पारितोषिक देण्यात आली. तसेच मराठी भाषा संवर्धन पंधरवडानिमित्त महामेट्रो तर्फे घोषवाक्य स्पर्धेचे देखील आयोजन करण्यात आले होते. यातील विजेत्यांचाही सन्मान करण्यात आला.