Wed, Jul 17, 2019 12:00होमपेज › Pune › पुणे व्यसनमुक्ती केंद्रात रोज पंधरा महिला

पुणे व्यसनमुक्ती केंद्रात रोज पंधरा महिला

Published On: Mar 06 2018 2:02AM | Last Updated: Mar 06 2018 2:02AMपुणे :अक्षय फाटक

शहरातील तरुण व अल्पवयीन मुले व्यसनाधीन होण्याचे प्रमाण वाढत असताना, व्यसनांच्या आहारी गेलेल्या किमान 15 महिला दररोज व्यसनमुक्ती केंद्रात येत आहेत. विशेष म्हणजे, महिलांमध्ये दारू, सिगारेटसोबतच आता हुक्का, गांजा व अफूची नशा करण्याचे प्रमाण वाढल्याचे दिसत आहे. यामध्ये महाविद्यालयीन तरुणींचा मोठ्या प्रमाणात समावेश असून, काही तरुणी अभ्यास करताना झोप येऊ नये म्हणूनही गांजा, अफूचे सेवन करतात. तर काही घटनांमध्ये  नशेसाठी औषधी गोळ्या घेणार्‍यांचे प्रमाण लक्षणीय असल्याचे आढळले. 

विद्येचे माहेरघर, शांत आणि सांस्कृतिक शहर आता जुने-पुराणे झाले आहे. आयटी हब ते स्मार्ट सिटीच्या दिशेने वाटचाल करणार्‍या या शहरात कोणत्याच गोष्टीची कमतरता नाही. त्यामुळे हे शहर प्रत्येकाला हवेहवेसे वाटते. आजही येथे सुख-शांती आणि सर्व सोयीसुविधा सहज मिळतात. राज्यातील कानाकोपर्‍यातून, तसेच परदेशातील नागरिकही येथे येतात.

नोकरी, शिक्षण, व्यवसाय आणि हाताला मिळेल ते काम करणार्‍या तरुणी अन् महिलांचे प्रमाण या शहरात मोठे आहे. महिला आज प्रत्येक क्षेत्रात पुरुषांच्या खाद्यांला खांदा लावून काम करताना पाहायला मिळत आहेत, ही स्तुत्य बाब आहे. पण दुसरीकडे याच महिला व्यसनांच्या वाटेवर जात असल्याचे  समोर आले आहे. या महिला व तरुणी व्यसनाधीनतेच्या जाळ्यात ओढल्या जात आहेत. यामध्ये महाविद्यालयीन तरुणींचे प्रमाण मोठे आहे. शहरातील व्यसनमुक्ती केंद्रचालकांशी ‘पुढारी’ने केलेल्या बातचितीमध्ये हे भयावह वास्तव समोर आले.

पुण्यात दररोज लाखो महिला नोकरी व शिक्षणानिमित्त घराबाहेर पडतात. परंतु न कळत त्या व्यसनांच्या आहारी जात आहेत. शहरात दररोज 15 ते 16 महिला व तरुणींचे पालक व्यसनमुक्ती केंद्रात धाव घेत आहेत. तरुणींमध्ये सिगारेट ओढण्याचे प्रमाण सर्वाधिक असल्याचे दिसत आहे. त्यानंतर मद्यपानाचा क्रमांक लागतो.

धक्कादायक म्हणजे, महाविद्यालयीन तरुणी हुक्का तसेच गांजा आणि अफू या अंमली पदाथार्र्ंचेही सेवन करतात. विशेष म्हणजे, अभ्यास करण्यासाठी आणि झोप येऊ नये यासाठी गांजा व अफू घेत असल्याचे त्यांच्याकडून सांगण्यात येत आहे. काही तरुणी या नशेसाठी औषधी गोळ्यांचेही सेवन करत असल्याची माहिती हाती आली आहे. कामाचा ताण आणि कमी वयात हातात आलेला भरमसाट पैसा यामुळेही या व्यासनाधीनतेला बळकटी मिळत आहे.   

ती सिगारेटही ओढते...

पिंपरी-चिंचवड भागातील इंजिनिअरिंग शिक्षण घेणारी एक मुलगी सतत चिडचिड करत होती. तसेच जास्त हायपर होत होती. मुलीतील अचानकच हा बदल झाल्याचे पालकांच्या निदर्शनास आले. त्यामुळे त्यांनी आनंंदवन व्यसनमुक्ती केंद्राकडे चौकशी केली. त्यांनी मुलीला केंद्रात घेऊन येण्यास सांगितले. तिची तपासणी केल्यानंतर ती गांजाही ओढत असल्याचे लक्षात आले. ती सकाळपयर्र्ंतच सिगारेटची दोन पाकिटे ओढत असल्याचे समोर आले आहे.  

राज्यभरातून पुण्यात 40 महिला

पुण्यात व्यसनमुक्तीसाठी काम करणार्‍या अनेक संस्था आहेत. तीन संस्थांकडे केलेल्या पाहणीत महिनाभरात राज्यभरातून जवळपास चाळीस महिला व तरुणी व्यसन मुक्ती केंद्रात दाखल होत असल्याची माहिती समोर आली आहे. या संस्थांकडून त्यांच्यावर उपचार करून, त्यांना व्यसनमुक्त करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत.

तर दर दिवसाला हेल्पलाइनवर 20 ते 22 कॉल येतात. त्यात 8 ते 10 फोन हे महिला व तरुणींच्या व्यसनांबाबत असतात. महिलांची बदलती जीवनशैली, कामाचा ताण, त्यासोबतच फॅशन म्हणून नशा करण्याचे प्रमाण वाढत आहे. अनुकरणाचे प्रमाणही जास्त आहे. मजा म्हणून केलेल्या एखाद्या व्यसनाची ‘लत’ लागते. एकंदरीत वाढती व्यसनाधीनता लक्षात घेता, पालक आणि विद्याथ्यार्र्ंमध्ये व्यसनासंदर्भात जागृती होणे गरजेचे आहे. याचे शारीरिक व मानसिक आरोग्यावर परिणाम तर होत आहेतच, पण वैवाहिक जीवनातसुद्धा समस्या निर्माण होत असल्याची उदाहरणे आहेत.

- डॉ. अजय दुधाने, आनंदवन व्यसनमुक्ती पुनर्वसन केंद्र, पुणे