होमपेज › Pune › हजेरी न भरल्यामुळे विद्यार्थी परीक्षेला मुकणार

हजेरी न भरल्यामुळे विद्यार्थी परीक्षेला मुकणार

Published On: Dec 06 2017 1:42AM | Last Updated: Dec 06 2017 1:09AM

बुकमार्क करा

पुणे : प्रतिनिधी 

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामध्ये विविध विभागात सध्या परिक्षा सुरु असुन परिक्षेला बसण्यासाठी 75 टक्के उपस्थिती बंधनकारक करण्यात आली आहे. तसेच ज्या विद्यार्थ्यांची हजेरी 75 टक्के भरणार नाही असे सर्व विद्यार्थी परीक्षेला मुकणार असून या विद्यार्थ्यांना परीक्षा देता येणार नसल्याची माहिती कुलगुरू डॉ.नितीन करमळकर यांनी दिली आहे.त्यामुळे विद्यापीठ आपल्या भूमिकेवर ठाम असल्याचे दिसत आहे.

विद्यापीठाच्या मराठी विभागतील दहा विद्यार्थ्यांना ऐन वेळी तुमची हजेरी 75 टक्के भरत नसल्यामुळे तुम्हाला परीक्षेला बसता येणार नसल्याचे मराठी विभागाकडून सांगण्यात आले होते. त्यामुळे मराठी विभागातील विद्यार्थी संतप्त झाले होते.काही विद्यार्थ्यांनी उपोषणाची तयारी देखील केली होती.तर काही विद्यार्थी संघटना याविरोधात मैदानात उतरण्याच्या तयारीत होत्या.परंतु विद्यापीठ प्रशासनाने मात्र नियमावर बोट ठेवत आपल्या भूमिकेवर ठाम राहण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे विद्यार्थ्यांचे मात्र शैक्षणिक नुकसान होणार आहे. 

यासंदर्भात कुलगुरू डॉ.नितीन करमळकर म्हणाले, मी नेहमीच विद्यार्थी हिताचा निर्णय घेत असतो.परंतु विद्यापीठाच्या अनेक विभागातील विद्यार्थी हे केवळ नावाला विभागात प्रवेश घेतात व स्पर्धापरीक्षांचा अभ्यास करतात. त्यामुळे अशा विद्यार्थ्यांची  विभागात 75 टक्के हजेरी भरत नाही. तसेच एका सत्रामध्ये 75 टक्के उपस्थिती पुर्ण होत नसल्यास सत्रातील अंतिम परिक्षा देता येणार नाही असा विद्यापीठाचा नियम असून  हा नियम विद्यापीठातील सर्व विभागांना लागू करण्यात आला आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना शिस्त लागावी यासाठी निर्णयावर ठाम राहण्याचा निर्णय विद्यापीठ प्रशासनाने घेतला आहे. 

विद्यापीठाच्या मराठी, संस्कृत, लायब्ररी सायन्स तसेच संरक्षण व सामरिक शास्त्र अशा विविध विभागात विद्यार्थी केवळ नावाला प्रवेश घेतात. ज्यामुळे विद्यार्थ्यांची राहण्याची तसेच खाण्याची सोय होते. आणि हे विद्यार्थी स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करतात. परंतु या विद्यार्थ्यांमुळे विद्यापीठात या विद्याशाखांना प्रवेश घेवून याच शाखांमध्ये आपले भवितव्य घडविण्याचा प्रयत्न करणार्‍या विद्यार्थ्यांचे नुकसान होत असून अशा विद्यार्थ्यांना विद्यापीठात प्रवेश घेता येत नसल्याची खंत देखील कुलगुरूंनी व्यक्त केली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी ज्या विभागांमध्ये प्रवेश घेतला आहे. तेथील हजेरीकडे लक्ष देण्याची गरज असून यापुढे विद्यार्थ्यांच्या गैरहजेरीबाबत त्यांची गय केली जाणार नसल्याचा अप्रत्यक्ष इशाराच विद्यापीठ प्रशासनाने दिला आहे.