Tue, Feb 19, 2019 06:03होमपेज › Pune › बाप्पांच्या स्वागतासाठी पुणेकरांचा उत्साह शिगेला!    

बाप्पांच्या स्वागतासाठी पुणेकरांचा उत्साह शिगेला!    

Published On: Sep 13 2018 1:46AM | Last Updated: Sep 13 2018 1:12AMखरेदीसाठी भाविकांची लगबग

मंडईसह बाजारपेठांमध्ये गर्दीचा उच्चांक

दुपारपर्यंत होणार मानाच्या गणपतींची प्राणप्रतिष्ठा

पुणे : प्रतिनिधी

गणरायाच्या आगमनाची आतुरतेने वाट पाहत असलेल्या पुणेकरांचा उत्साह शिगेला पोहोचला आहे. बाप्पाच्या पूजेचे साहित्य, आरास, सजावटीचे साहित्य, मोदक, लाडू, पेढे खरेदीसाठी मिठाईच्या दुकानांमध्ये बुधवारी मोठी गर्दी झाली होती. गुरुवारी (दि. 13) गणरायाच्या स्वागतासाठी सार्वजनिक मंडळे आणि कुटुंबे  सज्ज झाली आहेत. 
भाद्रपद शुद्ध चतुर्थी अर्थात गणरायाची प्राणप्रतिष्ठा गुरुवारी सूर्योदयापासून सकाळी नऊ वाजेपर्यंत सर्वोत्तम असल्याचे जाणकारांनी सांगितले आहे. दरम्यानच्या कालावधीत ‘श्रीं’ना नैवेद्य दाखविण्यासाठी वेळही लाभदायक आहे; तसेच सूर्योदयापासून  दुपारपयर्र्ंत सर्वसाधारण मुहूर्त आहे.

अनेक कुटुंबीयांनी बुधवारी सकाळपासूनच गणरायाची मूर्ती घरी नेण्यास प्राधान्य दिले होते. ढोल-ताशे, टाळ-मृदंगाच्या गजरात बाप्पाला घरी घेऊन जाण्यासाठी अबालवृद्धांचा उत्साह पाहण्याजोगा होता. दगडूशेठ हलवाई मूर्ती, पुणेरी पगडी, गरुडावर बसलेला गणपती, उंदरावर बसलेल्या गणपतीला घरगुती गणपतींसाठी सर्वाधिक मागणी होती.
कसबा गणपतीची मिरवणूक 8.30 वाजता मानाचा पहिला गणपती कसबा गणपतीचे यंदाचे 126 वे वर्ष असून, सकाळी साडेआठ वाजता मिरवणूक काढली जाईल. त्यानंतर विधिवत प्राणप्रतिष्ठा होईल. मानाचा दुसरा तांबडी जोगेश्‍वरी गणपतीचे यंदाचे 126 वे वर्ष असून, दुपारी साडेबाराला, तर मानाचा तिसरा गुरुजी तालीम गणपतीचे 132 वे वर्ष असून, दुपारी एक वाजता प्राणप्रतिष्ठा केली जाईल. मानाचा चौथा तुळशीबाग गणपतीचे 118 वे वर्ष असून, साडेबारा वाजता प्राणप्रतिष्ठा केली जाईल. मानाचा पाचवा केसरीवाडा गणपतीची प्राणप्रतिष्ठा साडेअकरा वाजता केली जाईल.