Fri, Apr 26, 2019 09:35होमपेज › Pune › पाणी पुरवठा योजनेसाठी सात कंपन्यांच्या निविदा

पाणी पुरवठा योजनेसाठी सात कंपन्यांच्या निविदा

Published On: Jan 06 2018 1:40AM | Last Updated: Jan 05 2018 11:59PM

बुकमार्क करा
पुणे : प्रतिनिधी

 बहुचर्चित समान पाणी पुरवठा योजनेच्या विविध कामांसाठी सात कंपन्यांनी निविदा दाखल केल्या आहेत. या कामाच्या सहापैकी चार झोनसाठीच या निविदा आल्या असून उर्वरीत दोन झोनच्या कामांसाठी एकही निविदा न आल्याने त्यासाठी दहा दिवसांची मुदतवाढ दिली आहे. मात्र ज्या चार झोनसाठी प्रत्येकी तीन कंपन्यांनी निविदा भरल्या आहेत, त्यामधील एका कंपनीने मुदत संपण्याच्या अखेरच्या क्षणी निविदा दाखल केली आहे, त्यामुळे ही निविदा प्रकियाही संशयाच्या भोवर्‍यात अडकण्याची शक्यता निर्माण झाली आहे.वादग्रस्त ठरलेल्या समान पाणी पुरवठा योजनेच्या जलवाहिन्यांसह, पाणी मीटर, योजनेची देखभाल दुरुस्ती अशा विविध कामांसाठी फेरनिविदा प्रकिया राबविली होती. त्याची मुदत शुक्रवारी संपली. त्यात सात कंपन्यांनी भाग घेतला असून  एल ऍन्ड टी, लक्ष्मी, एस.पी.एम.एल, जैन इरिगेशन, पटेल इंजिनिअरींग, टाटा, एसएमसी आणि कोया या कंपन्यांनी निविदा भरल्या.

 योजनेच्या विविध कामांसाठी प्रशासनाने सहा झोन केले आहेत. त्यामधील झोन क्र. 2, 3, 5 आणि 6 या झोनसाठी प्रत्येकी तीन कंपन्यांनी निविदा भरल्या आहेत. तर उर्वरीत 1 आणि 4  या दोनसाठी एकाही कंपनीने निविदा भरलेली नाही. त्यामुळे या झोनच्या कामांच्या निविदांसाठी 15 जानेवारीपर्यंतच्या मुदतवाढीचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. तर ज्या चार झोनसाठी प्रत्येकी तीन निविदा आल्या आहेत, त्यांच्या निविदांचे दर हे 15 जानेवारीनंतर म्हणजेच उर्वरीत दोन झोनच्या निविदा दाखल झाल्यानंतरच उघडण्यात येणार असल्याची माहिती पाणी पुरवठा विभागाचे अधिक्षक अभियंता व्ही.जी.कुलकर्णी यांनी दिली.

अखेरच्या क्षणीच्या निविदेने मुदतवाढ टाळली ; मात्र संशय वाढविला समान पाणी पुरवठा योजना सातत्याने वादाच्या भोवर्‍यात सापडत आहे. यापुर्वी जलवाहिनीच्या कामाचे इस्टीमेट फुगविण्यात आल्याचा तसेच या कामाच्या निविदा प्रकियेत रिंग झाल्याचे आरोप झाले होते. त्यामुळे प्रशासनाला या निविदा रद्द कराव्या लागल्या, त्यामुळे प्रशासनाने निविदांमध्ये जाईन्ट व्हेंचर करण्यास परवानगी दिली. त्यानंतर आता ज्या निविदा आल्या आहेत, त्यात एका कंपनीने निविदा भरण्यास अखेरच्या तासात निविदा भरल्या आहेत. या कंपन्यांच्या निविदा आल्या नसत्या तर चार झोनमध्ये केवळ दोनच निविदा राहिल्या असत्या, त्यामुळे निविदा प्रकियेत पुरेशी स्पर्धेअभावी त्यासाठी पुन्हा मुदतवाढ द्यावी लागली असती, ही मुद्तवाढ टाळण्यासाठी शेवटच्या तासाभरात एका कंपनीने चार झोनसाठी निविदा भरल्या, त्यामुळे अखेरच्या क्षणी निविदा भरणारी कंपनी ही बोगस (डमी) असल्याची चर्चा पालिका वर्तुळात आहे. त्यामुळे ज्या काही विशिष्ट कंपन्यांना हे काम देण्याचा घाट घातला गेला होता, त्यांच्याच पदरी हे काम पडणार असल्याचे स्पष्ट झाले असून त्यामुळे ही निविदा प्रक्रिया पुन्हा एकदा वादाच्या भोवर्‍यात सापडली आहे.