Thu, Apr 25, 2019 15:55होमपेज › Pune › कंपन्यांनी फिरविली निविदांकडे पाठ

कंपन्यांनी फिरविली निविदांकडे पाठ

Published On: Dec 11 2017 1:33AM | Last Updated: Dec 11 2017 12:04AM

बुकमार्क करा

पुणे : प्रतिनिधी

समान पाणीपुरवठा योजनेतील विविध कामांसाठी राबविण्यात येत असलेल्या निविदा प्रकियेत सहभागी होण्यास काही आंतरराष्ट्रीय कपंन्यांनी अनुत्सुकता दाखविली आहे. निविदा प्रकियात झालेल्या आरोप-प्रत्यारोपामुळेही  ही योजना  वादग्रस्त ठरली असल्याने संबंधित कंपन्यांनी हा पवित्रा घेतला आहे; त्यामुळे ही निविदा प्रकिया पुन्हा अडचणीत येण्याची भीती व्यक्त केली जात आहे. 
समान पाणीपुरवठा योजनांतील सतराशे किलोमीटर लांबीच्या जलवाहिनीच्या निविदा तब्बल 26 टक्के वाढीव दराने आल्या होत्या. त्यात सहभागी झालेल्या तीन कंपन्यांचे दर जवळपास सारखेच होते. या निविदा प्रकियेत गैरव्यवहार झाल्याचे आरोप झाले.

त्यामुळे अखेर या निविदा रद्द कराव्या लागल्या, त्यानंतर आता प्रशासनाने पुन्हा  जलवाहिन्यांच्या कामासह, पाणी मीटर, ऑप्टिकल फायबर डक्ट आणि देखभाल दुरुस्ती अशा विविध कामांसाठी फेरनिविदा प्रकिया राबविली आहे.  निविदा दाखल करण्यासाठी 28 डिसेंबरची अखेरची मुदत आहे. मात्र प्रशासनाने या निविदांसाठी ज्या अटी व शर्ती निश्‍चित केल्या आहेत त्यानुसार यापूर्वी ज्यांनी जलवाहिनीच्या कामासाठी निविदा दाखल केल्या होत्या, त्याच तीन कंपन्या या निविदा प्रकियेत भाग घेऊ शकतात, अशी परिस्थिती आहे. 

मात्र यामधील एका आंतरराष्ट्रीय कंपनीने या निविदा प्रकियेत सहभागी न होण्याचा पवित्रा घेतला आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, संबंधित कंपनीने जलवाहिनीच्या कामासाठी निविदा भरली होती. या कंपनीचे परदेशात मुख्य कार्यालय आहे, या कार्यालयाने 3 टक्के वाढीव दराने निविदा भरण्याची सूचना केली होती. प्रत्यक्षात मात्र ही निविदा 25 टक्के जादा भरली गेली, याची कल्पना कंपनीच्या मुख्य कार्यालयाला नव्हती. दरम्यान वाढीव दराच्या निविदा प्रकियेत आरोप-प्रत्यारोप झाल्यानंतर संबंधित कंपनीच्या मुख्य कार्यालयापर्यंत हा प्रकार केला. त्यामुळे आता या कंपनीने समान योजनेच्या जलवाहिनीच्या कामाच्या निविदा प्रकियेत सहभागी होऊ नये अशा सूचना येथील कार्यालयाला केल्या आहेत.

विशेष म्हणजे संबंधित आणखी एका कंपनीनेही असाच पवित्रा घेतला असल्याचे सांगण्यात येत आहे; त्यामुळे संबंधित कंपनीने निविदा न भरल्यास एक अथवा दोनच निविदा येऊ शकतात. परिणामी त्यासाठी पुन्हा मुदतवाढ द्यावी लागण्याची भीती आहे; त्यामुळे ही सर्व निविदा प्रकिया अडचणीत येऊ शकते असे सूत्रांकडून सांगण्यात आले. सहभागी होण्यासाठी विनवणी   संबंधित आंतरराष्ट्रीय कंपनीने निविदा प्रकियेत सहभागी व्हावे यासाठी महापालिकेतील एका अतिवरिष्ठ अधिकार्‍याकडून कंपनीला विनवणी करण्यात आली आहे; मात्र अद्यापही कंपनीने आपली भूमिका स्पष्ट केलेली नाही. या निविदा उघडल्यानंतरच काय ते चित्र स्पष्ट होईल, असेही सांगण्यात आले.