Mon, Aug 19, 2019 07:31होमपेज › Pune › पाणी वाटप तिढा गंभीर!

पाणी वाटप तिढा गंभीर!

Published On: Sep 12 2018 1:49AM | Last Updated: Sep 12 2018 1:38AMपुणे : प्रतिनिधी

‘पीएमआरडीए’च्या पाणीवाटपाबाबत निर्णय घेण्यासाठी पाणी वापर समितीची पहिली बैठक येत्या शुक्रवारी होणार आहे. शहराच्या पाण्यात काटकसर करून तब्बल 8 टीएमसी पाणी पीएमआरडीएला देता येईल, असा अहवाल जलसंपदा विभागाकडून यापूर्वीच देण्यात आला आहे. महापालिकेने मात्र शहराच्या पाण्यात कपात करता येणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. त्यामुळे पाणी वाटपाचा तिढा अधिक गंभीर होण्याची शक्यता आहे. 

पुणे महानगर क्षेत्र विकास प्राधिकरणाने (पीएमआरडीए) 3 टीएमसी पाण्याची मागणी केली आहे. त्यावर निर्णय घेण्यासाठी राज्य शासनाने नगरविकास खात्याच्या प्रधान सचिवांच्या अध्यक्षतेखाली सात सदस्यांची पाणीवाटप समिती समिती स्थापन केली आहे. ही समिती पाणी वाटपाबाबत नव्याने निर्णय घेणार आहे. या समितीची पहिली बैठक येत्या शुक्रवारी (दि.14) मुंबईत बोलाविण्यात आली आहे. त्यासाठी शासनाने पुणे महापालिकेकडून पाण्याच्या सद्यःस्थितीबाबतची सविस्तर माहिती मागविली आहे. दरम्यान महापालिकेकडून सद्यःस्थितीला दरवर्षी 16 टीएमसी पाणी उचलले जात आहे. पाटबंधारे विभागाने महापालिकेला 2017 पर्यंत 8.19 टीएमसी पाणी मंजूर केले आहे. त्यानुसार महापालिकेने पाणी वापरात पुढील बचत केल्यास उर्वरित तब्बल 8 टीएमसी पाणी ‘पीएमआरडी’ला देता येणे शक्य असल्याचा अहवाल जलसंपदा विभागाने एप्रिल महिन्यात दिलेला आहे. महापालिकेने मात्र शहराची लोकसंख्या  48 लाखांवर पोहचली असून सद्यःस्थितीला जे पाणी उचलले जात आहे. त्यात काटकसर करता येणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. त्यामुळे आता पाणी वाटपाचा मुद्दा गंभीर होण्याची शक्यता असून पुण्याच्या पाण्याला कात्री लावण्याचा निर्णय झाल्यास त्यावरून नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.