Tue, Jul 16, 2019 21:49होमपेज › Pune › ‘वस्त्र धुलाई’ची निविदा नियमबाह्य पद्धतीने

‘वस्त्र धुलाई’ची निविदा नियमबाह्य पद्धतीने

Published On: Feb 14 2018 2:55AM | Last Updated: Feb 14 2018 1:04AMपुणे : राहुल अडसूळ

मोहननगर, चिंचवड येथील राज्य कामगार विमा योजना रुग्णालय (ईएसआयएस) प्रशासनाने 2017-18 च्या वस्त्र धुलाई व इस्त्रीचे  टेंडर नियमबाह्य पद्धतीने भोसरीतील ‘साईनाथ ड्राय क्‍लीनर्स’ या कंत्राटदाराला दिल्याचा प्रकार समोर आला आहे. याबाबत औंधमधील सोनी आणि पिंपरीतील कल्याणी ड्राय क्‍लानर्स या दोन निविदाधारकांनी राज्य कामगार विमा योजना रुग्णालयाच्या आयुक्तालयाकडे (मुंबई) धाव घेऊन या प्रकरणाची सखोल चौकशी करून टेंडर रद्द करावे, अशी मागणी केली आहे.    सदर निविदा प्रक्रिया पूर्ण होण्याआधी निविदेतील अनेक त्रुटींबद्दल आक्षेप नोंदवूनही स्थानिक प्रशासनाने काणाडोळा करत ‘साईनाथ ड्राय क्‍लीनर्स’ला  कंत्रात बहाल केल्याचा दावा दोन्ही तक्रारदारांनी केला आहे. 
 

ईएसआयएस रुग्णांच्या मलीन कपड्यांसाठी  ‘वस्त्र धुलाई व इस्त्री’ या कामाचे दरवर्षी साधारण सात लाख रुपये किमतीचे कंत्राट खाजगी व्यक्तीला   दिले जाते.  यंदाही 2017-18 या वर्षासाठी रुग्णालय प्रशासनाने 1 नोव्हेंबर  2017 रोजी याबाबत ई निविदा क्र. 146 चे टेंडर काढून ऑनलाईन निविदा भरण्याचे आवाहन केले होते.  त्यातील वेळापत्रकानुसार दि. 17  व 20 नोव्हेंबर 2017 ही अनुक्रमे  ई निविदा क्र. 146 बाबत तांत्रिक (क्र. 1) व व्यावसायिक (किंमत) लिफाफा उघडण्याची तारीख दिली होती.  त्यानुसार  कल्याणी, सोनी आणि साईनाथ ड्राय  क्‍लीनर्स या तिघांकडून ऑनलाईन निविदा भरण्यात आल्या.

मात्र वैद्यकीय अधीक्षक, निवासी वैद्यकीय अधिकारी, प्रशासकीय अधिकारी व कार्यालयीन अधीक्षकांनी  तांत्रिक व व्यावसायिक (किंमत) लिफाफे उघडले.  ही सर्व प्रक्रिया पारदर्शक पद्धतीने सर्व निविदाधारकांना बोलावून त्यांच्या उपस्थितीत पूर्ण करणे आवश्यक होते. मात्र रुग्णालयातील वरील चार प्रमुख अधिकारी आणि केवळ साईनाथ ड्राय क्‍लीनर्स या निविदाधारकाच्या उपस्थितीत व्यावसायिक लिफाफे उघडण्यात आले. मुळातच सर्व निविदाधारकांनी कागदपत्रांची पूर्तता केली असेल तरच दुसरा व्यावसायिक लिफाफा उघडला जातो.

मात्र  साईनाथ ड्राय क्‍लीनर्स निविदाधारकाच्या बहुतांश कागदपत्रांत त्रुटी असतानाही प्रशासनाने त्यांनाच प्राधान्य देत व्यावसायिक लिफाफा उघडला.  मात्र कागदपत्रांची नियमानुसार पूर्तता करणार्‍या कल्याणी आणि सोनी ड्राय क्‍लीनर्सना सहभागी करून घेतले गेले नाही, असे तक्रारदारांचे म्हणणे आहे. तक्रारदारांनी कागदपत्रे अपूर्ण असल्याचे डॉ.  सरोदे यांच्या लक्षात आणून दिल्यानंतरही त्यांनी  ‘साईनाथ’ची निविदा मंजूर केली व ‘वर्क ऑर्डर’ काढली. त्यातही उशीर केल्याचे तक्रारदार आदिती विष्णू  राऊत यांचे म्हणणे आहे. दि. 1 डिसेंबर 2017 रोजी टेंडरची वर्क ऑर्डर काढणे आवश्यक असताना त्यात जाणीवपूर्वक विलंब करण्यात आल्याचे अन्य तक्रारदार गणेश परदेशी  यांनी ‘पुढारी’शी बोलताना सांगितले. 

यंदाच्या ‘वस्त्र धुलाई व इस्त्री’ निविदा नियमबाह्य पद्धतीने देण्यात आल्याची  तक्रार कामगार आयुक्त कार्यालयाकडे (मुंबई) करण्यात आली होती. त्याबाबत आमच्याकडून अहवालही सादर केलेला आहे. आमच्याकडून ई-निविदेची सर्व प्रक्रिया पारदर्शक पद्धतीने झाली.

-डॉ. श्रीकांत सरोदे, वैद्यकीय अधीक्षक,  ईएसआयएस, रूग्णालय, मोहननगर