Thu, Nov 15, 2018 07:54होमपेज › Pune › ‘बीआरटीएस’ला प्रतीक्षा निर्णयाची

बीआरटीएस’ला प्रतीक्षा निर्णयाची

Published On: Dec 20 2017 2:38AM | Last Updated: Dec 20 2017 2:27AM

बुकमार्क करा

पिंपरी ः नरेंद्र साठे

पिंपरी-चिंचवडच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा विषय बनलेल्या दापोडी-निगडी ‘बीआरटीएस’ मार्ग अद्यापही सुरू झालेला नाही; मात्र हा ‘बीआरटीएस’ मार्ग खुला होण्यास सज्ज असून, प्रत्यक्ष बस धावण्यास उच्च न्यायालयाच्या निर्णयाची प्रतीक्षा आहे. दापोडी-निगडी ‘बीआरटीएस’च्या दोन्ही मार्गिकांवरील 95 टक्के कामे पूर्ण झाल्याचा दावा महापालिकेकडून करण्यात आला आहे. शेवटची फिनिशिंगची कामे सध्या उरकण्यात येत असल्याची माहिती अधिकार्‍यांनी दिली.

यापूर्वी शहरातील सांगवी ते किवळे आणि वाकड ते नाशिकफाट्या दरम्यानचा ‘बीआरटीएस’ मार्ग प्रवाशांसाठी खुला करण्यात आला; परंतु या दोन्ही मार्गांपेक्षा दापोडी ते निगडीदरम्यानचा रस्ता हा महामार्गावरील आहे. पुणे-मुंबई महामार्गावर दापोडी ते निगडीदरम्यान ग्रेडसेपरेटर असून, ‘इन’ आणि ‘आऊट’ असल्याने वाहतुकीसंदर्भात प्रश्‍न चिन्ह उपस्थित झाले होते. या संदर्भात आयआयटी पवई या संस्थेकडून वाहतूक सुरक्षितता तपासणी करून घेण्यात येत आहे. संस्थेने सांगितलेल्या सूचनेनुसार काही फेरबदल करण्यात येत असून, पुढील आठवड्यात या ‘बीआरटीएस’ मार्गावर चाचणी घेण्यात येणार आहे. या चाचणीनंतर आयआयटी पवईचा अहवाल उच्च न्यायालयात सादर करून, त्यावर न्यायालयाच्या निर्णयानंतर मार्ग वाहतुकीसाठी खुला होणार की नाही हे ठरणार आहे.

सुमारे पाच ते सहा वर्षांपासून ‘बीआरटीएस’चा प्रश्‍न रेंगाळत पडला आहे. वारंवार केवळ तारखा देण्यात आल्या; परंतु प्रत्यक्षात दापोडी-निगडी ‘बीआरटीएस’ मार्ग काही सुरू झाला नाही. आयुक्त श्रवण हर्डीकर यांनी सूत्रे हाती घेतल्यानंतर ‘बीआरटीएस’ मार्गाची पाहणी करून ऑक्टोबरअखेर ‘बीआरटीएस’मार्ग खुला करण्याच्या सूचना अधिकार्‍यांना दिल्या; परंतु ऑक्टाबरनंतर दोन महिन्यांचा कालावधी गेला तरी देखील ‘बीआरटीएस’ मार्गावर बस धावलेली नाही. पीएमपीएमएलचे व्यवस्थापकीय संचालक तुकाराम मुंढे यांच्याशी चर्चा करून दापोडी-निगडी ‘बीआरटीएस’ मार्गाची चाचणी घेण्यात येणार आहे.