Sun, Aug 25, 2019 00:14होमपेज › Pune › वाहन फिटनेसची खुशखबर

वाहन फिटनेसची खुशखबर

Published On: Dec 17 2017 2:21AM | Last Updated: Dec 17 2017 1:12AM

बुकमार्क करा

पुणे ः  नवनाथ शिंदे

वाहन योग्यता तपासणीसाठी (फिटनेस) आरटीओच्या दिमतीला नव्याने चार वाहन टेस्ट ट्रॅकची उभारणी करण्यात येणार आहे. त्यामुळे पासिंगअभावी रखडलेल्या हजारो वाहनांचा मार्ग मोकळा होणार आहे. सामाजिक दायित्व निधीतून (सीएसआर फंड ) येत्या 15 दिवसांत दिवे घाटातील आरटीओच्या जागेत ट्रॅक उभारणीचा शुभारंभ करण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. 
राज्यातील सर्वाधिक वाहनांची संख्या असलेल्या पुणे आरटीओतंर्गत फिटनेस तपासणीसाठी वाहनांच्या रांगा लागत आहेत. अपुरे मनुष्यबळ, उपलब्ध असलेल्या एकाच टेस्ट ट्रॅकमुळे फिटनेससाठी नागरिकांना दोन ते तीन महिन्यांची प्रतीक्षा करावी लागत आहे.

उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर शासनाच्या वतीने दिवे घाटात वाहन टेस्ट ट्रॅकची उभारणी करण्यात आली आहे. त्यानुसार नव्याने उभारण्यात आलेल्या ट्रॅकवर 21 नोव्हेंबरपासून वाहनांची तपासणी करण्यात येत आहे. येथे दरदिवशी 50 ते 75 वाहनांची फिटनेस केली जात आहे. शहरात परिवहन संवर्गातील वाहनांची संख्या जास्त असल्याने दिवसेंदिवस फिटनेस तपासणीचा आकडा वाढत चालला आहे. दरम्यान, फिटनेस तपासणीची वाहनकोंडी फोडण्यासाठी आरटीओच्या एका वरिष्ठ अधिकार्‍याच्या प्रयत्नानंतर सीएसआर फंडातून नव्याने चार टेस्ट ट्रॅकची उभारणी करण्यात येणार आहे. अवघ्या 10 ते 15 दिवसांत दिवे घाटातील आरटीओच्या जागेत ट्रॅकच्या कामाचा शुभारंभ करण्यात येणार आहे. 

उच्च न्यायालयाच्या 18 फेब्रुवारी 2016 च्या आदेशानुसार परिवहन संवर्गातील वाहनांची योग्यता तपासणी शासकीय मालकीच्या जमिनीवरील ट्रॅकवर घेणे आवश्यक होते. मात्र, राज्यातील  बहुतांश प्रादेशिक आणि उपप्रादेशिक कार्यालयांतर्गत स्वमालकीचे वाहन टेस्ट ट्रॅक उपलब्ध नव्हते. परिणामी ट्रॅकअभावी वाहनांची तपासणी करता येणार नसल्यामुळे 1 नोव्हेंबरपासून आरटीओच्यावतीने फिटनेस तपासणी बंद करण्यात आली. दरम्यानच्या कालखंडात सार्वजनिक बांधकाम विभागाच्यावतीने दिवे घाटात सुरू असलेल्या टेस्ट ट्रॅकचे हस्तांतरण आरटीओला करण्यात आले. 
त्यानंतर वाहनांची योग्यता तपासणी सुरू करून प्रमाणपत्र देण्यास सुुरुवात करण्यात आली. मागील काही दिवसांपासून आरटीओ अधिकारी आणि कर्मचार्‍यांकडून वाहन तपासणीसाठी चक्क सुटीच्या दिवशीही काम केले जात आहे. तरीही फिटनेस तपासणीची वाहनसंख्या कमी होत नाही.