Sun, Mar 24, 2019 17:10होमपेज › Pune › १५ हजारांवर वाहने सुसाट

१५ हजारांवर वाहने सुसाट

Published On: Dec 24 2017 1:46AM | Last Updated: Dec 24 2017 12:09AM

बुकमार्क करा

पुणे ःनवनाथ शिंदे

अपुरे मनुष्यबळ, जमिनीवरील ट्रॅकवर वाहन तपासणीचा न्यायालयाचा आदेश, राज्यातील सर्वाधिक वाहनांची संख्या अशा अनेक अडचणींमुळे दिवसेंदिवस फिटनेस तपासणीच्या आकडेवारीत भर पडत आहे. त्यामुळे अनेक व्यावसायिकांची हजारो वाहने बिनदिक्कतपणे रस्त्यावर सुसाटपणे धावत आहेत. दरम्यान,  आरटीओ कर्मचार्‍यांचा वाहन फिटनेस तपासणीचा वेग दिवसाला 75 वाहनांचा आहे. परिणामी अवघ्या  महिन्यात तब्बल 15 हजारांवर वाहनांची फिटनेस तपासणी रखडली आहे.

    उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार फिटनेस ट्रॅक नसणार्‍या प्रादेशिक आणि उपप्रादेशिक परिवहन कार्यालयांतर्गत होणारी वाहन योग्यता तपासणी 1 नोव्हेंरपासून बंद केली होती. परिणामी शहरातील हजारो वाहनांचे फिटनेस रखडले गेले. त्यानंतर 21 नोव्हेंबरपासून आरटीओच्या दिवे घाटात तयार करण्यात आलेल्या  ट्रॅकवर वाहनांची फिटनेस तपासणी सुुरू करण्यात आली. मात्र, मनुष्यबळ आणि जादा ट्रॅकअभावी दरदिवशी फक्त 50 वाहनांना ऑनलाईन अपाँइंटमेंट देण्यात येत आहे. त्यामुळे परिवहन संवर्गातील बस, ट्रक, रिक्षा, ट्रक, टेम्पो, ट्रँकर पासिंगविना रखडली जात आहे. दरम्यान, पासिंग रखडल्यामुळे मालवाहतूक करणार्‍या व्यावसायिकांकडून आर्थिक फटका बसू नये म्हणून हजारो वाहने विनापासिंग रस्त्यावर चालविली जात आहेत.

आरटीओ कर्मचार्‍यांकडून एक वाहन तपासणीला साधारणपणे 20 ते 25 मिनिटांचा कालावधी लागत आहे. मॅन्युअली फिटनेस तपासणी करताना त्रुटी राहण्याची शक्यता असल्यामुळे न्यायालयाच्या आदेशानुसार जमिनीवरील ट्रॅकवर वाहनांची तपासणी करण्यात येत आहे. सद्य:स्थितीत 250 मीटर ट्रॅकवर वाहनांच्या पासिंगसाठी वाहनाचा वेग, ब्रेक, लाईट बीमसाठी तपासणीसाठी वेळ लागत आहे. वाहनांची संख्या जास्त असल्यामुळे फिटनेस तपासणीच्या आकडेवारीत भर पडत आहे.  

   दरम्यान, आरटीओने 21 नोव्हेंबर ते 23 डिसेंबरच्या कालावधीत 1 हजार 800 वाहनचालकांना फिटनेस तपासणीची ऑनलाईन अपाँइंटमेंट दिली होती. तर याचकालखंडात वाहन योग्यता तपासणीसाठी तब्बल 15 हजारांवर वाहनमालकांनी अर्ज केले आहेत. दरम्यान, वाहन योग्यता तपासणीचा वेग वाढविण्यासाठी आरटीओ प्रशासनाकडून दोन शिफ्टमध्ये काम करण्याची मागणी संघटनेच्या वतीने करण्यात येत आहे. मात्र, सर्वाधिक वाहनसंख्या असलेल्या शहरात फिटनेससाठी परिवहन संवर्गातील वाहनांचा वेग मोठा आहे. आरटीओ कर्मचार्‍यांकडून सुटीच्या दिवशी काम करूनही फिटनेस तपासणीची वाहनसंख्या कमी होत नाही.