Mon, Jun 17, 2019 02:42होमपेज › Pune › वाहनांच्या फिटनेससाठी ‘तारीख पे तारीख’

वाहनांच्या फिटनेससाठी ‘तारीख पे तारीख’

Published On: Jan 14 2018 1:54AM | Last Updated: Jan 14 2018 12:47AM

बुकमार्क करा
पुणे : नवनाथ शिंदे 

राज्यातील प्रवासी आणि मालवाहतूक संवर्गात असणार्‍या प्रत्येक वाहनाची दरवर्षी फिटनेस तपासणी करणे बंधनकारक आहे; मात्र, ऑनलाईन अपॉइंटमेंटसाठी वाहनमालकांना मिळणारी ‘तारीख पे तारीख’ आणि आरटीओच्या मनुष्यबळाअभावी तब्बल 16 हजारांवर वाहने फिटनेस तपासणीच्या प्रतीक्षेत आहेत; तर ऑनलाईन यंत्रणेत वारंवार बिघाड होत असल्याने वाहनयोग्यता तपासणीचा आकडा दिवसेंदिवस वाढत  आहे.

दिवे घाटात तयार करण्यात आलेल्या ट्रॅकवर दि. 21 नोव्हेंबरपासून वाहनांची नव्याने फिटनेस चाचणी सुरू केली; मात्र मनुष्यबळाअभावी तसेच दरदिवशी अवघ्या 75 वाहनमालकांना ऑनलाईन अपॉइंटमेंट देण्यात येत आहे. त्यामुळे शहरात वाहनांच्या फिटनेस तपासणीचा आकडा काही हजारांवर वाढत चालला आहे. दरम्यान अनेक वेळा ऑनलाईन यंत्रणा सक्षमरीत्या काम करत नसल्याने किरकोळ दुरुस्तीसाठी वाहनमालक आरटीओ कार्यालयात हेलपाटे मारत आहेत.  तसेच वाहनमालकांना ऑनलाईन पावती मिळत नाही. तर आरटीओकडून ऑफलाईन अपडेट केले जात नसल्याने अनेकांनी नाराजी व्यक्त केली आहे.  

बँकेचा हप्‍ता, व्याज मिटविण्यासाठी मालवाहू आणि प्रवासी संवर्गातील वाहनमालकांकडून विनाफिटनेस वाहने दामटली जात आहेत; त्यामुळे फिटनेसशिवाय व्यवसाय करणार्‍या वाहनांना पोलिसांनी अटकाव केल्यास चिरीमिरी दिल्याशिवाय सुटका केली जात नाही; त्यामुळे वाहनमालकांचा फिटनेस तपासणीसाठी जादा वेळ, पोलिसांना चिरीमिरी; तर आरटीओ कार्यालयात चकरा मारण्यासाठी जात आहे. मॅन्युअली वाहनांची तपासणी करताना त्रुटी राहत असल्यामुळे न्यायालयाच्या आदेशानुसार सद्यःस्थितीत दिवे गावातील ट्रॅकवर वाहनांची तपासणी प्रगतिपथावर आहे.

वाहन तपासणीचा बोजा वाढल्यास  वाहनचालकांना मिळालेली अपॉइंटमेंट बदलली जात आहे; तर वाहन तपासणीचा वेग कमी असल्यामुळे फिटनेससाठी रखडणार्‍या वाहन संख्येत भर पडली आहे. जमिनीवरील ट्रॅकवर सुरू केलेल्या फिटनेस तपासणीदरम्यान 3 हजार 700 पेक्षा अधिक वाहनांना ग्रीन सिग्नल देण्यात आला आहे; मात्र उर्वरित वाहनांच्या फिटनेस तपासणीसाठी आरटीओला मुर्हूत कधी मिळणार असा सवाल वाहनमालकांनी केला आहे.