Wed, Jul 17, 2019 11:59होमपेज › Pune › उत्तरप्रदेशने काबीज केली गुळाची बाजारपेठ

उत्तरप्रदेशने काबीज केली गुळाची बाजारपेठ

Published On: Jan 24 2018 8:32AM | Last Updated: Jan 24 2018 12:50AMपुणे  प्रतिनिधी

साखरेप्रमाणेच उत्तरप्रदेशच्या गुळाने अन्य राज्यांतील बाजारपेठा काबीज केल्याचा परिणाम म्हणून महाराष्ट्रातील गुळास मागणी कमी झालेली आहे. त्यामुळे चालूवर्षीचा ऊस गाळप हंगाम सुरू झाल्यापासून गेल्या अडीच महिन्यात गुळाचे भाव क्विंटलमागे 800 ते 1 हजार रुपयांनी घसरले आहेत. त्यावर राज्य कृषि पणन मंडळाच्या बैठकीत चिंता व्यक्त करून गुर्‍हाळ उद्योग तोट्यात चालल्याने उपाययोजना करण्याची मागणी बाजार समित्यांच्या प्रतिनिधींनी केली.

राज्य कृषि पणन मंडळामध्ये शनिवारी कृषि व पणन राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्या अध्यक्षतेखाली गुळाची अधिक आवक होत असलेल्या बाजार समित्यांच्या प्रतिनिधींची महत्वपूर्ण बैठक झाली. त्यामध्ये सभापती, सचिवांनी गूळ दर घसरणीतील माहिती मांडून उपाययोजना करण्याची मागणी केली. याबाबत कोल्हापूर कृषि उत्पन्न बाजार समितीचे सचिव दिलीप राऊत म्हणाले, गुळाचा हंगाम सुरू होताना क्विंटलचा सरासरी भाव 3 हजार 700 रुपये होता.

तो सध्या सरासरी 800 ते 1 हजार रुपयांनी घटून 2 हजार 700 रुपयांपर्यंत खाली आला आहे. साखरेला गुळाचा पर्याय आहे. गूळ तयार करण्यासाठी क्विंटलला 700 ते 800 रुपयांचा खर्च येत आहे. सध्याचे भाव पाहता ही रक्कम वजावट केल्यास उसाला अपेक्षित किंमत मिळत नाही. साहजिकच गुर्‍हाळ चालविणे तोट्याचे झाले आहे. गुळाचा टिकाउपणा कमी असल्याने शीतगृह उभारणीचा प्रस्ताव आम्ही मंडळास देत आहोत.