होमपेज › Pune › नात्यांतील अविश्‍वासामुळे हेरांची चलती

नात्यांतील अविश्‍वासामुळे हेरांची चलती

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

पुणे : पुष्कराज दांडेकर 

लग्न जमविणे, नवरा  किंवा बायकोला फसवून कुणाला भेटणे,  आई-वडिलांशी खोटे बोलून इतर उद्योग केले किंवा कार्यालयात खोटी कागदपत्रे देणे असे उद्योग केले  असतील तर सावधान, बदलत्या काळानुरूप जीवनशैलीमुळे विवाह, तसेच नाती, व्यवसायात अविश्‍वास वाढत आहे. त्यामुळे अनेकांना त्याचे परिणाम भोगावे लागले आहेत. फसवणूक टाळण्यासाठी, एकमेकांवर नजर ठेवण्यासाठी आणि हालचालींचा मागोवा घेण्यासाठी सांस्कृतिक नगरीत खासगी गुप्तहेरांची मदत घेण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. गेल्या काही महिन्यांमध्ये या गुप्तहेरांची शहरात मोठ्या प्रमाणात मागणी वाढल्याची माहिती हाती आली आहे. 

 नुकताच प्रदर्शित झालेला गुप्तहेरांवरील ‘फाफे’ चित्रपट असेल, किंवा अनेक वर्षांपूर्वीचे प्रायव्हेट डिटेक्टिव्हवरील आधारित चित्रपट असतील, या अशा बॉलिवूड आणि हॉलिवूड पटातच आपण खासगी गुप्तहेरांना पाहिले आहे. या  चित्रपटांमधून दिसणारे गुप्तहेर व्यावसायिक स्वरूपात काही वर्षांपूर्वी शहरांमध्ये उदयास आले आहेत. मात्र वेळेचा अभाव, तसेच वाढलेला अविश्‍वास, फसवणुकीचे प्रकार सर्रासपणे घडत असल्याने त्याची सत्यासत्यता पडताळण्यासाठी अशा खासगी गुप्तहेरांची मदत घेण्याचे प्रमाण सध्या वाढले असल्याचे चित्र शहरांमध्ये दिसते. त्यात पुण्यात आता खासगी गुप्तहेरांची  (प्रायव्हेट डिटेक्टिव्ह) मागणी  वाढलेली आहे.

 काही वर्षांपूर्वी गुप्तहेरांची मदत घेण्याचे प्रमाण श्रीमंतवर्गात प्रामुख्याने पत्नीचे किंवा पतीचे विवाहबाह्य संबंध आहेत का हे शोधण्यासाठी  केला जात होता; परंतु बदलत्या काळासोबत लग्न जमविताना दिलेली माहिती, कार्यालयात दिलेली खोटी कागदपत्रे, पती-पत्नीचे विवाहबाह्य संबंधांचे प्रमाणही वाढलेले आहे. अशा प्रकरणांमध्ये  सामान्यांकडूनही गुप्तहेरांची सर्रासपणे मदत घेतली जात आहे. 
बदलत्या जीवनशैलीमुळे सध्या धावपळ वाढली आहे. त्यामुळे कुटुंबातील नात्यांमध्ये कटुता निर्माण होणे, कुटुंबाला वेळ कमी देणे, परस्परांतील संवाद कमी होणे अशा कारणांमुळे एकमेकांवरील विश्‍वासच कमी होत आहे. नाती, व्यवसाय, व्यवहारांमध्ये अनेकदा विश्‍वास ठेवून केलेल्या कृतींमध्ये  अनेकांना फसवणुकीला सामोरे जावे लागते आहे.

एकमेकांना फसविण्याचे प्रमाण वाढलेले आहे; त्यामुळे आपोआपच पती-पत्नी असोत, नवीन नाती जोडण्याची वेळ असो,  नवीन मोठा व्यवहार करायचा असो किंवा व्यवसाय असो यामध्ये वेळेअभावी व समोरील व्यक्ती, संस्था यांच्याबद्दल परिपूर्ण माहिती नसणे याबाबतचा अविश्‍वास आणि आपली फसवणूक होऊ नये याची भीती प्रत्येकालाच असते; त्यामुळे आपल्या समोरील जोडीदार, व्यक्ती, संस्था यांच्याबाबत विश्‍वास निर्माण होण्यासाठी त्यांची हेरगिरी करून त्यांच्याबाबतची विश्‍वासार्हता पडताळण्याची गरज निर्माण होत आहे. अशा प्रकारे खासगी गुप्तहेरांची गरज सध्या भासली आहे. 
 व्यवसायाची तेजी 

पूर्वी उच्चभ्रू वर्गात पती-पत्नीचे विवाहबाह्य संबंध पडताळण्यासाठी गुप्तहेरांचा प्रामुख्याने वापर होत होता; मात्र आता मध्यमवर्गातही खासगी गुप्तहेरांची मदत घेण्याचे प्रमाण वाढले आहे. आपल्या देशाची लोकसंख्या पाहता आता देशातही खासगी गुप्तहेरांच्या व्यवसायात वृद्धी झालेली आहे. पुण्यात नामवंत आणि जाणकार अशा काही गुप्तहेर एजन्सी आहेत; परंतु वर्तमानपत्रात जाहिराती देऊन ग्राहकांना आकर्षित करणारे गुप्तहेरही वाढत आहेत. त्यांची मागणी दरवर्षी वाढतच आहे. भारतात वाढत्या फसवणुकीच्या घटना, आर्थिक फसवणूक यांचा विचार करता दरवर्षी या व्यवसायात तीस टक्क्यांनी वाढ होत असल्याचे निरीक्षण मागील महिन्यात झालेल्या ‘वर्ल्ड असोसिएशन ऑफ डिटेक्टिव्ह’च्या वार्षिक परिषदेत मांडण्यात आले होते. पुण्यासह अनेक मेट्रो शहरांमध्ये खासगी गुप्तहेरांची मागणी वाढत आहे. मात्र त्यांची नोंदणी सुरक्षा एजन्सीच्या स्वरूपात केली जाते आणि त्या एजन्सीद्वारेच हेरगिरीची कामे केली जातात, असे एका प्रायवेट डिटेक्टिव्ह एजंटने सांगितले