Thu, May 23, 2019 14:32
    ब्रेकिंग    होमपेज › Pune › अनधिकृत टपरी हटविण्यावरून वाद

अनधिकृत टपरी हटविण्यावरून वाद

Published On: Jan 06 2018 1:47AM | Last Updated: Jan 06 2018 1:44AM

बुकमार्क करा
पुणे : प्रतिनिधी

गुलटेकडी मार्केटयार्डात उभारण्यात आलेली अनधिकृत टपरी हटविण्यावरून शुक्रवारी (दि. 5)पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या एक विद्यमान संचालक आणि आडत्यांमध्ये जोरदार खडाजंगी झाली. 
संबंधित संचालकाच्या खास कार्यकर्त्यांची असलेली टपरी काढण्यावरून हा वाद इतका टोकाला गेला की, एकमेकांच्या अंगावर धावून जाण्याचे बाकी होते. या घटनेमुळे बाजार समिती प्रशासक मंडळाकडूनच नियमांची पायमल्ली करून टपरीला संरक्षण दिले जात असल्याची चर्चा बाजार आवारात आहे.

पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या गुलटेकडी मार्केटयार्डात भाजीपाला विभागात गेल्या काही दिवसांपूर्वी नव्याने दोन अनधिकृत टपर्‍या सुरू करण्यात आल्या आहेत.  या टपर्‍यांमुळे वाहतूक कोंडीत भर पडत असून अतिरिक्त शेतमाल लावण्यास अडचणी निर्माण झाल्या आहेत. त्यामुळे या टपर्‍या हटवाव्यात, अशी मागणी आडते असोसिएशनने प्रशासक मंडळाकडे केली होती. प्रशासक मंडळातील काही संचालकांच्या कार्यकर्त्यांच्या या टपर्‍या असल्यामुळे त्यावर कारवाईकडे दुर्लक्ष करण्यात आले. 

शुक्रवारी (ता. 5) सकाळी नविन रस्त्यातील टपरी काढण्याची भूमिका काही आडत्यांनी घेतली. या वादात एक विद्यमान आणि एक माजी संचालक समोरासमोर आले. त्यात आडते बाजूला राहून दोघांमध्येच वादावादी झाली. याबाबत श्री छत्रपती शिवाजी मार्केटयार्ड आडते असोसिएशनचे अध्यक्ष विलास भुजबळ म्हणाले, बाजारात अनधिकृतपणे नव्याने सुरू झालेल्या टपर्‍यांमुळे वाहतूक कोंडी होत असून जास्तीचा शेतमाल ठेवण्यास जागा मिळत नाही. 

त्यामुळे वाहतुकीला अडथळा होणार्‍या टपर्‍या काढून टाकाव्यात अशी प्रशासक मंडळाकडे लेखी निवेदनाद्वाारे मागणी केली होती. मात्र, त्यावर अद्याप कारवाई झालेली नाही. याविषयावर सोमवारी बैठक होणार असून त्यावेळी याप्रश्‍नी चर्चा करण्यात येणार आहे.