Sat, Mar 23, 2019 00:22होमपेज › Pune › दिशादर्शक कमानींवर अनधिकृत फलकांचे तोरण

दिशादर्शक कमानींवर अनधिकृत फलकांचे तोरण

Published On: Dec 11 2017 1:33AM | Last Updated: Dec 11 2017 12:11AM

बुकमार्क करा

पुणे : प्रतिनिधी

शहरातील अनेक जागांवर अनधिकृत फलक लागले असून रस्त्यांवरील दिशादर्शक कमानीही त्यातून सुटलेले नाहीत. त्यामुळे शहराच्या सौंदर्यात बाधा निर्माण होत  असून अनधिकृत तोरण प्रशासनाची हतबलता स्पष्ट करत आहेत. शहरात फिरत असताना कोणत्याही ठिकाणी जाणार्‍या प्रवाशांसाठी पथदर्शक फलक आणि कमानी असाव्यात हा साधा नियम आहे. स्मार्ट सिटीकडे वाटचाल वाटचाल करत असणार्‍या पुण्यनगरीत मात्र दिशादर्शक कमानी अनधिकृत फलक लावण्यासाठीची सोयीस्कर जागा बनल्या आहेत. शहरातील सर्व खांब, रस्त्यांचे कोपरे अनधिकृत फलकांनी भरलेले असतातच. महापालिकेचा आकाशचिन्ह आणि परवाना विभाग यावर कोणतीही हालचाल न करता कारवाईची आकडेवारी दाखवण्यात गर्क आहे. त्यामुळे आता दिशा बघण्याऐवजी राजकीय फलक बघण्याची दशा पुणेकरांची झाली आहे.

सध्या शहरात अनेक महोत्सव आणि कार्यक्रमांचे वातावरण आहे. याशिवाय राजकीय नेत्यांचे वाढदिवस, अभिनंदन असे फलक लावण्याचा सिलसिला बाराही महिने सुरूच असतो. सध्या टिळक चौकासह अनेक ठिकाणी असणार्‍या कमानींवर राजकीय नेत्यांच्या वाढदिवसाच्या शुभेच्छांचे फलक आहेत. त्यावर कारवाई करण्याऐवजी महापालिका वाढदिवस होऊन स्वतःहून फलक काढण्याची वाट बघत आहे. एकीकडे सांस्कृतिक राजधानी म्हणून राज्यात प्रसिद्ध असणार्‍य शहराचे विद्रुपीकरण सुरू असून त्याबाबत आवाज उठवण्यासही कोणी तयार नाही तेच दुर्दैव आहे.