Wed, Apr 24, 2019 21:27होमपेज › Pune › हवेतल्या पदार्थांची अनोखी दुनियादारी...(video)

हवेतल्या पदार्थांची अनोखी दुनियादारी...(video)

Published On: Apr 11 2018 12:04AM | Last Updated: Apr 11 2018 2:50PMपुणे : प्रतिनिधी

“ऐसा क्या हुआ रे ऐसा क्यों हुआ रे,
‘थॉट’चा हा ‘शॉट’ नको रे...’’ अशी ‘दुनियादारी’ची वेगळीच गंमत पुण्यात पाहायला मिळते. पुणेकर काय डोकं लढवतील न् काय ‘जुगाड’ करतील याचा भरवसा नाही. असंच एक जुगाड केलंय, पुण्यातील एसपी कॉलेजसमोरच्या उदयविहार हॉटेलनं... तिथं खवय्यांसाठी पदार्थ चक्क हवेतून येतात... पण यात कसलाही ‘झोल’ नाहीये तर, हॉटेलमालक उदय लवाटे यांनी लढविलेली शक्कल आहे. 

एका इमारतीतून दुसर्‍या इमारतीत जाण्याचे कष्ट आणि वेळ वाचविण्यासाठी लवाटेकाकांनी ‘रोप वे’ तयार केला आहे. पलिकडच्या इमारतीतील किचनमध्ये बनवलेले खाद्यपदार्थ ‘रोप वे ट्रे’मधून उदयविहार हॉटेलमध्ये येतात. हे हॉटेल चक्क 1956पासून इथं आहे. सुहास शिरवळकरांच्या दुनियादारी कादंबरीतही या हॉटेलचा उल्लेख आहे. या हॉटेलचा परिसर दुनियादारी सिनेमातही दिसतो. आता या हॉटेलचं रुपांतर स्नॅक्स सेंटरमध्ये झालंय. कॉलेज स्टुडंटचा इथं नेहमीच गलबला असतो. लेक्चरला दांडी मारून लवाटेकाकांच्या या खाद्यकट्ट्यावर आलं की ऑर्डरी सुटतात. मग काका बेल वाजवतात. काकू खिडकीत येतात. काका खाणाखुणा करतात किंवा दोन इडली-सांबार..., तीन पोहे..., चार मिसळ... अशी ऑर्डर सोडतात. मग हे गरमागरम पदार्थ समोरच्या लीनाकाकूंच्या किचनमधून ट्रेमध्ये मजेत बसून हवेतून तरंगत येतात. गप्पागोष्टी करत या पदार्थांचा फन्ना उडत राहतो...  

Image may contain: outdoor

सुरुवातीला तब्बल दीडशे मुलं बसतील एवढी मोठी जागा होती. काळाच्या ओघात ही जागा छोटी झाली पण, ना लीनाकाकूंच्या हातची चव बदलली ना विद्यार्थ्यांची संख्या घटली! इथल्या पदार्थांची चवही अनोखी आहे. टपोर्‍या इडल्यांमध्ये मटार, गाजर, फ्लॉवर अशा भाज्या टाकलेल्या असतात. त्यासोबत ओला नारळ आणि डाळ घातलेली चटणी मिळते. पोहे, उपमा, बटाटेवडा, मिसळ हे इथले ‘फेव्हरेट’ पदार्थ आहेत. यासोबतच भेळ, एस. पी. डी. पी. खायला तसेच कोकण सरबत, पन्हे, ताक प्यायला विद्यार्थी इथं गर्दी करतात. लवाटेकाकांनी 1998पासून हा रोप वे सुरू केलाय. तो विद्यार्थ्यांनाही सवयीचा झालाय. 

Image may contain: 1 person, food

लवाटेकाकांनी विद्यार्थ्यांच्या अनेक बॅच पाहिल्यात. इथं येऊन गेलेेले विद्यार्थी काकांच्या हातची चव विसरत नाहीत. शहर सोडून गेलेले विद्यार्थी पुण्यात आल्यावर आवर्जून लवाटेकाकांच्या हातचे पदार्थ खायला येतात. जुन्या आठवणी जागवतात, खाऊन तृप्त होतात. त्यावेळी लवाटेकाकांच्या चेहर्‍यावरचं समाधान पाहण्यासारखं असतं. 

 

Tags : pune, uday vihar hotel, spacial story, pune news