Mon, Sep 24, 2018 16:53होमपेज › Pune › रेल्वेच्या आरक्षण फॉर्मवर अखेर मराठीला स्थान 

रेल्वेच्या आरक्षण फॉर्मवर अखेर मराठीला स्थान 

Published On: Jan 17 2018 5:28PM | Last Updated: Jan 17 2018 5:28PM

बुकमार्क करा
पुणे: प्रतिनिधी 

मध्य रेल्वेच्या पुणे विभागातील रेल्वे आरक्षण फॉर्मवर अखेर मराठीला स्थान देण्यात आले आहे. यापूर्वी केवळ हिंदी व इंग्रजी भाषेमध्ये पुण्यात आरक्षण फॉर्म उपलब्ध होता. मराठीमध्ये फॉर्म उपलब्ध नसल्याने मातृभूमीतच मराठीला केराची टोपली रेल्वेकडून दाखविण्यात येत होती. 

मराठीला स्थान देण्यात न आल्याने ज्यांना हिंदी व इंग्रजी भाषा येत नाहीत, अशांचे प्रचंड हाल होत होते. दरम्यान, राज्य सरकारने राज्यातील केंद्र सरकारच्या कार्यालयांमध्ये हिंदी, इंग्रजीसह मराठी भाषाही बंधनकारक केली होती. 

यामुळे बँक, टपाल, मेट्रो, विमानतळासह राज्यातील सर्व रेल्वे स्थानकांवर मराठीचा वापर बंधनकारक आहे, असा आदेश राज्य सरकारने दिला होता. या आदेशाचे पालन रेल्वेकडून करण्यात आले आहे. दरम्यान, मध्य रेल्वेच्या पुणे विभागाकडून मराठी भाषेला देण्यात येणार्‍या सापत्न वागणुकीबाबत दै. पुढारीने वारंवार वृत्त प्रसिद्ध केले होते. 
त्यामुळे पुणे स्थानकावरील काही पाट्या मराठीमध्ये तयार करून बसविण्यात आल्या. आता आरक्षण फॉर्मवर देखील मराठी भाषेला देण्यात आलेल्या स्थानामुळे नागरिकांनी समाधान व्यक्त करत दै. पुढारीचे कौतुक केले आहे.