Wed, Jul 24, 2019 14:10होमपेज › Pune › पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये दिवसेंदिवस वाढतोय वाहतूककोंडीचा फास

पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये दिवसेंदिवस वाढतोय वाहतूककोंडीचा फास

Published On: Feb 14 2018 2:55AM | Last Updated: Feb 14 2018 12:44AMपुणे :नवनाथ शिंदे 

शहरातील वाहतूककोंडीचा विळखा दिवसेंदिवस वाढत चालला आहे. अरुंद रस्ते, वाढलेली वाहनसंख्या, बेशिस्त वाहनचालकांमुळे पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये वाहन चालविताना नागरिकांचा जीव अक्षरशः मेटाकुटीला येत आहे. त्यामुळे रस्त्यावर किरकोळ अपघात झाल्यास वाहनांच्या रांगाच रांगा लागत आहेत. विशेषतः दोन्ही  शहरात मध्यवर्ती भागासह उपनगरांमध्ये सकाळी आणि सायंकाळी अवघ्या काही मिनिटात वाहनांच्या रांगा वाढत चालल्या आहेत. आरटीओच्या नोंदीनुसार दिवसाला तब्बल 1 हजार 800 वाहनांची खरेदी केली जात आहे. त्यामुळे काही वर्षांतच फक्त वाहतूककोंडीमुळे हैराण होणार्‍या नागरिकांना शहर नकोसे वाटणार आहे.

शहरात उद्योग, व्यापार, व्यवसाय, शिक्षण घेण्यासाठी राज्यभरातून नागरिकांचा लोंढा वाढतो आहे. सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सुरळित नसल्यामुळे अनेकांकडून खासगी वाहनांना प्राधान्य दिले जात आहे. त्यामुळे काही वर्षांतच रस्त्यांवर दुचाकी आणि चारचाकी वाहनांचे प्रमाण तुलनेत 20 ते 25 पटीने वाढले आहे. दरदिवशी वाहतूककोंडीचा जटील प्रश्‍न वाहनचालकांना त्रासदायक ठरत आहे. अस्ताव्यस्थ पार्किंग, चिंचोळे रस्ते, बेशिस्त वाहनचालक, रस्त्याशेजारी अतिक्रमण, व्यवसायायिकांचे रस्त्याशेजारील जाहिरातबाजीचे फलक, रस्त्यावर पथारी व्यवसायिकांमुळे वाहतूककोंडीत भर पडत आहे.

आरटीओच्या नोदींनुसार सन 2000 मध्ये पुणे शहरात फक्त 78 हजार 605 वाहनांची संख्या होती. त्यामध्ये सर्वाधिक 59 हजार दुचाकी होत्या. तर चारचाकींची संख्या 10 हजार होती. त्यानंतर 18 वर्षांत दिवसेंदिवस नागरिकांकडून वैयक्तिक वाहन खरेदीला प्राधान्य दिल्यामुळे  2018 सालापर्यंत शहरात तब्बल 28 लाख वाहनांची वर्दळ वाढली आहे. वाहन खरेदीच्या वेगात रस्ते, पुलांची लांबी रुंदी तेवढीच आहे. त्यामुळे दर शनिवार आणि रविवारी होणारी जीवघेणी वाहतूककोंडी काही दिवसांत नित्यनियमाची होणार आहे. 

पिंपरी-चिंचवडमध्ये 16 वर्षांपुर्वी वाहनांची संख्या 31 हजार 384 होती. दरम्यान औद्योगिक कंपन्यांची संख्या वेगाने वाढल्यामुळे राज्यभरातून अनेक कामगार शहरात वास्तव्यास आले. त्यानंतर मागील काही वर्षांत शिक्षण, छोटे-मोठे व्यवसायिकांनी खासगी वाहनखरेदीला प्राधान्य दिले. त्यामुळे 2018 पर्यंत वाहनांची आकडेवारी 13 लाख 50 हजारांवर पोहचली आहे.

पिंपरी-चिंचवडमध्ये 2002 ते 2010 पर्यंत दरवर्षी साधारणपणे 52 ते 55 हजार वाहनांची खरेदी करण्यात येत होती. मात्र, 2010 ते 2017 पर्यंतच्या कालखंडात वाहन खरेदीचा वेग दुपटीने वाढून दरवर्षी साधारणपणे शहरात 1 लाख 22 हजार वाहने रस्त्यांवर आली आहेत. त्यामुळे विविध रस्त्यांवर वाहतूककोंडीचा बोजवारा उडत आहे. याचा सर्वाधिक फटका हिंजवडीमध्ये काम करणार्‍या अभियंत्यांना सहन करावा लागत आहे. पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये वाहतूककोंडीचा जटील प्रश्‍न वाहनखरेदीच्या वाढलेल्या वेगाने कमी होणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे.