Sat, Apr 20, 2019 09:53होमपेज › Pune › शहरात वाहतूककोंडीने त्रेधा

शहरात वाहतूककोंडीने त्रेधा

Published On: Dec 17 2017 2:21AM | Last Updated: Dec 17 2017 12:29AM

बुकमार्क करा

पुणे ः प्रतिनिधी

शहरात शनिवारी दुपारपासूनच वाहतूककोंडीने नागरिकांना चांगलाच मनस्ताप सहन करावा लागला. विशेषतः टिळक रस्ता, बाजीराव रस्ता, फर्ग्युसन रस्ता, सदाशिव पेठ परिसरात वाहतुकीचा बोजवारा उडाला होता. बेशिस्त वाहनचालक, सिग्नल तोडून प्रवास करणारे, तसेच वेडीवाकडी वाहन चालविणार्‍यांमुळे वाहतूककोंडीत अधिकच भर पडली होती. त्यामुळे उपनगरातून शहराच्या मध्यवर्ती भागात येणार्‍या चाकरमान्यांना कामावर पोहचण्यास उशीर झाला होता.    टिळक रस्त्यांवर शनिवारी दुपारी बारा वाजल्यापासूनच वाहतूककोंडी झाली होती. 

त्यामुळे वाहतुकीचा वेग मंदावला होता. तर डेक्कन, बाजीराव रस्ता, फर्ग्युसन रस्ता, एम. जी. रस्त्यावर वाहतुकीला काही प्रमाणात खोडा निर्माण झाला होता. दरम्यान, वाहतूककोंडीमुळे महाविद्यालयीन तरुण-तरुणी, महिला, पुरूष प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागला. सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सक्षम नसल्यामुळे आणि खासगी वाहनाने प्रवासाला प्राधान्य देणार्‍या नागरिकांमुळे दिवसेंदिवस शहरातील विविध रस्त्यांवर वाहतूककोंडीचा बोजा वाढत चालला आहे. दर शनिवारी आणि रविवारी खरेदीच्या निमित्ताने घराबाहेर पडणार्‍या नागरिकांची संख्या जास्त असते. परिणामी बेशिस्त वाहन पार्किंग, दुचाकी आणि चारचाकी वाहनांचे रस्त्याच्या कडेला वाहने उभी करणे अशा प्रकारांमुळे वाहतूककोंडीचा मनस्ताप पादचार्‍यांना सहन करावा लागत आहे. 

शहरात दिवसेंदिवस वाढणारी वाहनसंख्या तर  बेशिस्त वाहनचालक आणि बेशिस्त पार्किंगमुळे होणारी वाहतूककोंडीने कामावर निघालेल्या चाकरमान्यांना अर्ध्यां ते एक तासाचा खोळंबा सहन करावा लागत आहे. मध्यवर्ती भागात सुरू असलेली बंदिस्त गटारांची कामे, आणि रस्त्याच्या कामांमुळे वाहतुकीचा वेग मंदावला जात आहे. परिणामी वाहतूक कोंडीचा फटका अनेकांना सहन करावा लागत आहे.