होमपेज › Pune › पर्यटकांनी फुले वाडा शोधायचा कसा

पर्यटकांनी फुले वाडा शोधायचा कसा

Published On: Jan 29 2018 1:45AM | Last Updated: Jan 28 2018 11:47PMपुणे : ज्योती भालेराव-बनकर 

सांस्कृतिक राजधानी म्हणून प्रसिध्द असलेल्या पुण्यामध्ये अनेक ऐतिहासिक वास्तू आहेत. बाहेरून येणार्‍या पर्यटकांना अशा वास्तू पाहण्यासाठी शहरामध्ये दिशादर्शक फलकांची वानवा दिसून येत आहे. त्यामुळे नव्याने येणार्‍या पर्यटकांना  पुण्यातील प्रसिध्द वास्तू किंवा स्थळे शोधताना संभ्रमावस्था निर्माण होत आहे. एतिहासिक दृष्ट्या महत्त्व असणार्‍या महात्मा फुले वाड्याला जाण्यासाठी पर्यटकांना बराच त्रास सहन करावा लागत आहे.

शहरात हा वाडा ‘गंज पेठेत’ असून या ठिकाणी पोहोचण्यासाठी महानगरपालिकेतर्फे रस्त्यांवर स्थळदर्शक फलक लावण्यात आलेले नाहीत. वाडा पाहण्यासाठी पहिल्यांदा येणार्‍या पर्यटकांना त्यामुळे मन:स्ताप सहन करावा लागत आहे.  महाराष्ट्रातील सामाजिक सुधारणांचे आद्य प्रवर्तक महात्मा फुले यांच्या जीवनातील अनेक घटनांशी आणि त्यांच्या सामाजिक चळवळीशी फुले वाडयाचे अतूट नाते आहे.  

या वाड्यापर्यंत पोहोचण्यासाठी अनेक मार्गांवरून जाता येते. गंजपेठेतील चौकातून जाताना अनेक छोट्या मोठ्या गल्ल्या पार कराव्या लागतात. अनेक ठिकाणी संभ्रम निर्माण करणारी वळणे आहेत. या सर्व ठिकाणी कोठेही ‘महात्मा फुले वाड्याकडे’ अशा नावाचा फलक लावण्यात आलेला नाही. त्यामुळे स्वत:च्या वाहनाने जाणार्‍यांसाठी येथे पोहोचणे खुपच अवघड जात असल्याचा अनुभव वाड्याला भेट देणार्‍या अनेक  पर्यटकांनी सांगितले.

पर्यटकांची फलक लावण्याची मागणी 

महानगरपालिकेने फुले वाड्याचे नुतनीकरण केले आहे. मात्र मोठा ऐतिहासिक वारसा असणार्‍या या वास्तूपर्यंत पोहोचण्यासाठी येथे येताना कुठेही दिशादर्शक फलक लावण्यात आलेले नाहीत. या वाड्याकडे जाणारा मार्ग वळणावळणाचा असल्याने संभ्रम निर्माण करणारा आहे. बरीच विचारपुस केल्यानंतर अखेरीस हा वाडा पहावयास मिळतो. अनेक ठिकाणी मार्ग चुकल्याने तिथेच फिरत बसावे लागत असल्याची भावना येथे भेट देणार्‍या पर्यटकांनी व्यक्त केली.