होमपेज › Pune › वाहनांवर दगडफेक करणार्‍या 600अज्ञातांवर गुन्हे

वाहनांवर दगडफेक करणार्‍या 600अज्ञातांवर गुन्हे

Published On: Jan 04 2018 2:07AM | Last Updated: Jan 04 2018 12:50AM

बुकमार्क करा
पुणे : प्रतिनिधी 

जमावाने रॅली काढून वाहने अडविणार्‍या आणि दगडफेक करणार्‍या अज्ञातांवर शहरातील वेगवेगळ्या पोलिस ठाण्यांमध्ये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. बंडगार्डन, लष्कर, पिंपरी, एमआयडीसी आणि बिबवेवाडी पोलिस ठाण्यांमध्ये जवळपास साडे पाचशे ते सहाशे अज्ञात व्यक्तींवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भीमा कोरेगाव येथील दोन गटातील वादाचे पडसाद पुण्यात मंगळवारी (दि. 3) उमटले. यावेळी शहरात वेगवेगळ्या ठिकाणी जमलेल्या जमावांनी केलेल्या दगडफेकीत 22 पीएमपी, काही एसटी बस आणि खासगी वाहनांचे नुकसान झाले. पिंपरी येथे सकाळी अकरा ते एकच्या दरम्यान 300 ते 350 अज्ञातांनी बेकायदेशीर जमाव जमवून आरडाओरडा करत सरकाविरोधात घोषणाबाजी करत रॅली काढून रास्ता रोको केला.

याप्रकरणी पिंपरी पोलिस ठाण्यात या 300 ते 350 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर सायंकाळी पाचच्या सुमारास पुणे रेल्वे स्थानकाच्या रस्त्यावर जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील आंबेडकर पुतळा ते जीपीओ रस्त्यावर 100 ते 150 अज्ञात व्यक्तींनी टायर जाळून एकूण 6 पीएमपीएमएल बसवर दगडफेक करून नुकसान केल्याप्रकरणी बंडगार्डन पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर, एमजी रोडवर मोठमोठ्याने घोषणाबाजी करत रास्ता रोको करत वाहनधारकांना अडविल्याप्रकरणी 30 ते 40 अज्ञातांवर लष्कर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यासोबतच कॅम्पातील इस्ट स्ट्रीटवर दुचाकीवरून आलेल्या अनोळखी व्यक्तींनी बसवर दगडफेक केल्याप्रकरणी त्यांच्यावरही लष्कर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नाशिक-पुणे महामार्गावर मोशी येथे तीन ते चार अनोळखी व्यक्तींनी बसवर दगडफेक करून 25 ते 30 हजारांचे नुकसान केल्याप्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. त्यानंतर सायंकाळी साडेसहाच्या सुमारास बिबवेवाडी येथील चैत्रबन वसाहत आणि अप्पर इंदिरानगर परिसरातील बस डेपो येथे घोषणाबाजी करत रॅली काढून वाहनांना अडवून तसेच तीन पीएमपी बस, दोन टेम्पो, एक टँकर यांच्यावर 30 ते 40 अनोळखी व्यक्तींनी दगडफेक करत नुकसान केल्याप्रकरणी बिबवेवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.