Sat, Aug 24, 2019 12:21होमपेज › Pune › चावी विसरलेल्या दुचाकी पळविणारे अटकेत

चावी विसरलेल्या दुचाकी पळविणारे अटकेत

Published On: Dec 23 2017 2:29AM | Last Updated: Dec 23 2017 2:24AM

बुकमार्क करा

पुणे : प्रतिनिधी

दुचाकीला चावी विसरलेल्या गाड्या हेरायच्या...ती चावी चोरायची अन् तेथेच उभे राहून त्या गाडी चालकाची वाट पाहायची...तो दुचाकी घेऊन जाताना त्याचा पाठलाग करायचा अन् गाड्या कोठे पार्क होते याची माहिती घ्यायची... त्यानंतर पार्क केलेल्या दुचाकी चोरलेल्या चावीने चोरून न्यायच्या...शहरात आता वाहन चोरट्यांनी अशा पद्धतीने शक्कल लढवत दुचाकी पळविण्यास सुरुवात केली असून, या पद्धतीने चोर्‍या करणार्‍या तीन चोरट्यांना हडपसर पोलिसांनी अटक केली आहे.  त्यांच्याकडून सात दुचाकी जप्त केल्या आहेत. विशेष म्हणजे, त्यांच्याकडून एक पिस्तूलही जप्त करण्यात आले आहे. 

ओमप्रकाश चंदुराम साहु (वय 20, रा. तरडेवस्ती, हडपसर), जीवा अर्जुन आहिर (वय 48, रा. ठाकूर चाळ, ठाणे) आणि सोमनाथ शंकर खोरदे (वय 24, रा. पाषाण) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.
शहरात वाहन चोरट्यांनी धुमाकूळ घातला आहे. त्यातही हडपसर परिसरात मोठ्या प्रमाणात वाहने चोरीला जाण्याच्या घटना घडत आहेत. तर, घरफोड्या अन सोन साखळी गुन्ह्यांमध्ये वाढ झाल्याने पोलिसांकडून विशेष मोहिम राबविण्यात येत होती. त्यानुसार हडपसर पोलिस मांजरी रोडवर नाकाबंदी केली. त्यावेळी संशयावरून तीन आरोपींना पकडले. त्यांची झडती घेतली असता, त्यांच्याकडे एक गावठी पिस्तुल, दोन काडतुसे, एक कोयता, चोरीची अ‍ॅक्टिव्हा आढळून आली. या आरोपींकडे तपास केला असता त्यांनी परिसरातून दुचाकी चोरल्याचे सांगितले. त्यांच्याकडून आणखी काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे. आरोपी जीवा याच्यावर पिंपरी पोलिस ठाण्यात आर्म अ‍ॅक्टचा गुन्हा दाखल आहे.