Fri, Jul 10, 2020 21:56होमपेज › Pune › स्पष्टता येईपर्यंत मॅरेथॉन स्पर्धेस निधी नाही :आयुक्त

स्पष्टता येईपर्यंत मॅरेथॉन स्पर्धेस निधी नाही : आयुक्त

Published On: Dec 02 2017 2:08AM | Last Updated: Dec 02 2017 2:04AM

बुकमार्क करा

पुणे ः प्रतिनिधी

पुणे आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन स्पर्धेची मान्यता भारतीय अ‍ॅथलेटिक्स महासंघाने नाकारल्याच्या पार्श्‍वभूमीवर स्पर्धेबाबत स्पष्टता येईपर्यंत या स्पर्धेसाठी कोणत्याही प्रकारचा निधी दिला जाणार नाही, अशी भूमीका महापालिका आयुक्त कुणाल कुमार यांनी घेतली आहे. त्यामुळे रविवारी होणार्‍या मॅरेथॉन स्पर्धेच्या आयोजकांसमोरील संकट उभे राहिले आहे. दरम्यान महापौर मुक्ता टिळक यांनी स्पर्धेसाठी निधी दिला जाईल असे म्हटले आहे.  

पुणे आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन स्पर्धेतील विजेत्यांना पालिकेच्या वतीने सुमारे 35 लाख रुपयांची बक्षिसे दिली जातात. गेल्या अनेक वर्षापासून पालिकेच्या वतीने हा निधी दिला जातो. यंदाच्या वर्षीच्या पालिकेच्या अर्थसंकल्पातही मॅरेथॉनसाठी निधीची तरतूद करण्यात आलेली असून गेल्या महिन्यात स्थायी समितीने याबाबतच्या प्रस्तावाला मान्यताही दिलेली आहे. मात्र या स्पर्धेस मान्यता नसल्याचे स्पष्ट करत भारतीय अ‍ॅथलेटिक्स महासंघाने धावपटूंना या स्पर्धेत सहभागी होऊ नये, असा सल्ला दिला आहे.  

भारतीय अ‍ॅथलेटिक्स महासंघाने मान्यता नाकारल्याचा पार्श्‍वभूमीवर स्पर्धेसाठी महापालिका निधी देणार का? असा प्रश्‍न  विचारला असता, जोपर्यंत या स्पर्धेबाबत स्पष्टता येत नाही, तोपर्यंत पालिका कोणताही निधी देणार नाही, अशी स्पष्टता पालिका आयुक्त कुमार यांनी दिल्याची माहिती सजग नागरिक मंचाचे विवेक वेलणकर यांनी दिली आहे.

दुसरीकडे या स्पर्धेसाठी तयार करण्यात आलेल्या स्वागत समितीच्या अध्यक्षपदी महापौर मुक्ता टिळक यांची नियुक्ती स्पर्धेच्या आयोजकांनी केली आहे. त्यामुळे अ‍ॅथलेटिक्स महासंघाने मान्यता नाकारलेल्या स्पर्धेस आणि महापौर टिळक स्वागत समितीच्या अध्यक्ष असलेल्या स्पर्धेस पालिका निधी देणार का, असा प्रश्‍न उपस्थित केला जात होता.