Wed, Apr 24, 2019 07:35होमपेज › Pune › पालिकेकडे ‘एमआरआय मशीन’ची वानवा

पालिकेकडे एमआरआय मशीन ची वानवा

Published On: Feb 12 2018 2:04AM | Last Updated: Feb 12 2018 12:01AMपुणे ; ज्ञानेश्‍वर भोंडे

पुणे शहरातील नागरिकांच्या आरोग्याची काळजी कुणालाच नाही. आज सुमारे 40 लाखाची लोकसंख्या असलेल्या शहराच्या महापालिकेकडे सुपर स्पेशालिटी (टर्शरी केअर) सेवा देणारे एकही मोठे हॉस्पिटल तर नाहीच, पण विविध आजारांचे त्वरित निदान करणारे ‘मॅग्‍नेटिक रेझोनन्स इमेजिंग’ (एमआरआय) मशीनदेखील नाही. यामुळे सर्वसामान्य नागरिकांना ‘एमआरआय’ची टेस्ट करून घेण्यासाठी खाजगी रुग्णालयात जावे लागत असून तेथे त्यांची लूट होत आहे. साधारणतः पंचवीसवर्षापूर्वी उदयास आलेल्या या तंत्रामुळे अनेक आजारांचे निदान लवकर आणि अचूक होउ लागले. क्ष किरण (एक्स रे), सोनोग्राफी, सीटी स्कॅन या निदान तंत्रांपेक्षा अद्ययावत असल्यामुळे नेमके निदान करता येते. यामुळे या तंत्राचा वापरही प्रचंड वाढला आहे.

पण एक एमआरआय करण्यासाठी कमीत कमी पाच हजारांपासून जास्तीत जास्त दहा ते बारा हजारांपर्यंत खर्च येतो. जर यामध्ये इंजेक्शन आणि काँट्रास्ट टेस्ट याचाच खर्चदोन ते अडीच हजार रुपये असतो. साधारणतः एका अवयवासाठी साडेसात ते आठ हजार इतका खर्च येतो आणि जास्त अवयव असतील तर तो 12 हजाराच्या वर जातो. आजकाल सर्वसामान्यांना अनेक वेळा डॉक्टर एमआरआय करायचे सूचवतात. त्यामुळे त्यामुळे त्याला इतका खर्च करणे भागच पडते.

म्हणून सर्वसामान्य आणि हातावर पोट असलेल्यांचा खिसा आणखी रिकामा होत आहे. काही तर उसणे पैसे घेउन कर्ज घेउन तसेच सोने गहाण ठेउन या तपासण्या करत आहेत. यामुळे आधीच इतर आरोग्याच्या उपचाराने बेजार झालेली जनता आणखीनच दारिद्—याच्या खाईत ढकलली जात आहे.  

55 सीटी स्कॅन ः शहरात खासगी 54 सीटी स्कॅन मशीन्स आहेत. तर महापालिकेचे केवळ एक सीटी स्कॅन असून ते बोपोडी येथे आहे. म्हणजेच रुग्णांना सीटी स्कॅन करण्यासाठीही खाजगी रुग्णालयांचाच आधार घ्यावा  लागत आहे.

रेडिओलॉजिस्टची 16 पदे रिक्‍त ः पालिकेत रेडिओलॉजिस्टची एकूण 17 पदे मंजूर आहेत. त्यापैकी केवळ एकच पद भरले असून बाकीची 16 पदे रिक्‍त असल्याची धक्‍कादायक माहिती समोर आली आहे. म्हणून पालिका आता हे पदे कधी भरणार आणि एमआरआय मशीन कधी घेणार असा प्रश्‍न नागरिकांना पडला आहे.  

पुण्यात 34 खाजगी एमआरआयची चांदी महापालिकेच्या आरोग्य विभागाकडे उपलब्ध असलेल्या माहितीनुसार शहरात रुग्णालये आणि स्वतंत्र सेवा म्हणून 34 एमआरआय कार्यरत आहेत. एक एमआरआय हा दिवसातून 10 ते 15 रुग्णांची सहज टेस्ट करू शकतो. म्हणजे एका खाजगी एमआरआय प्रतिरुग्ण सरासरी सात हजार रुपये धरले तरी दिवसाला सत्तर हजार ते एक लाख रुपये छापत आहेत. 

मुंबईत चार हॉस्पिटल पण पुण्यात झिरो   मुंबई महापालिकेत महापालिकेची चार वैद्यकीय महाविद्यालये आणि रुग्णालये आहेत. पण पुण्यासारख्या जगातील नावाजलेल्या महापालिकेला एकही वैद्यकीय महाविद्यालय नसू नये ही शरमेची बाब आहे. या चारही वैद्यकीय महाविद्यालयात अनेक कमी पैशांत उपचार होतात. पण पुण्यात असे एकही हॉस्पिटल नसल्याने आणि पर्यायाने एमआरआय नसल्याने पुुणेकरांचा खिसा रिकाम होत आहे.

शासकीय रुग्णालयातील ‘एमआरआय’वर ताण  पुण्यात केवळ ससून रुग्णालय आणि पिंपरीतील वायसीएम रुग्णालय येथे सरकारी खर्चात म्हणजे दोन हजारात एका अवयवाचा एमआरआय होतो. पण तेथे रुग्णालयातील दाखल रुग्ण आणि बाहेरुन आलेले रुग्ण यांचा लोड वाढल्यामुळे तेथे किमान पंधरा- पंधरा दिवसांचे वेटिंग करावे लागते. तसेच तेथेही दिवसाला 18 ते 20 एमआरआय होतात. औंध जिल्हा रुग्णालयातही पीपीपी तत्त्वावर एमआरआय मशीन असून मात्र तेथेही पात्र रुग्णांना सूट दिली जात नसून त्यांची लूट केली जाते.