होमपेज › Pune › हेरगिरी करून फ्लॅट फोडणार्‍यांना अटक

हेरगिरी करून फ्लॅट फोडणार्‍यांना अटक

Published On: Dec 06 2017 1:42AM | Last Updated: Dec 06 2017 1:12AM

बुकमार्क करा

पुणे : प्रतिनिधी

राहत्या परिसरातील बंद घराच्या कमकुवत खिडक्या आणि जुनाट घरे हेरून घरफोड्या करणार्‍यांना खडकी पोलिसांनी सापळा रचून अटक केली. त्यांच्याकडून अकरा गुन्हे उघडकीस आणत पावणेचार लाखांचा माल जप्त करण्यात आला आहे. 

अजिंक्य ऊर्फ सनी रवींद्र वाघमारे (वय 19), गणेश संजय वाघमारे (वय 19, दोघेही, रा. महादेववाडी, खडकी) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. त्यांच्या 16 वर्षीय अल्पवयीन साथीदाराला ताब्यात घेण्यात आले आहे.

शहरात घरफोड्या करणार्‍या सराइतांनी धुमाकूळ घातला आहे. दररोज तीन ते चार घरे फोडून लाखोंचा माल लंपास केला जात आहे. दरम्यान वरिष्ठांनी या सराइतांची माहिती काढून त्यांना जेरबंद करण्याचे आदेश दिले आहेत. दरम्यान खडकी परिसरात गेल्या काही दिवसांपासून घरफोड्यांचे सत्र सुरू होते. तपास पथक आणि गुन्हे शाखा माग काढत होते. मात्र, आरोपी पोलिसांच्या हाती लागत नव्हते. दरम्यान खडकी पोलिस ठाण्यातील  तुषार शिंदे, प्रदीप गाडे व पथकातील  कर्मचारी पेट्रोलिंग करत होते. त्या वेळी खबर्‍यामार्फत माहिती मिळाली की, दोघांनी अल्पवयीन साथीदारांच्या मदतीने घरफोडी केली आहे. त्यानुसार, अल्पवयीन साथीदारांसह तिघांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे तपास केला असता खडकी पोलिस ठाण्यातील घरफोडीचे एकूण 11 गुन्हे उघडकीस आले. तसेच, 3 लाख 83 हजार रुपयांचे सोन्या-चांदीचे दागिने जप्त करण्यात आले आहेत. अजिंक्य आणि गणेश हे दोघेही मिळेल ते कामे करतात. ते याच परिसरात राहण्यास आहेत. 

दरम्यान दोघे परिसरात हेरगिरी करायचे.  जुन्या इमारती त्यासोबतच कमकुवत असणार्‍या फ्लॅटच्या खिडक्या पाहायचे. त्यानुसार, अल्पवयीन मुलाला घरात सोडायचे. त्यानंतर दोघेही आत शिरून माल लंपास करत असल्याचे तपासात समोर आले आहे. परिमंडल चारचे पोलिस उपायुक्त दीपक साकोरे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ निरीक्षक लक्ष्मण बोराटे, पथकातील हेमंत माने, तुषार शिंदे, प्रदीप गाडे, रामदास मेरगळ, सुरेश गेंगजे यांच्या पथकाने ही कारवाई केली.