Fri, Jul 19, 2019 18:35होमपेज › Pune › पुण्यात कर्करोग रुग्णांची मोजदाद नाही

पुण्यात कर्करोग रुग्णांची मोजदाद नाही

Published On: Feb 04 2018 1:56AM | Last Updated: Feb 03 2018 11:49PM पुणे  :ज्ञानेश्‍वर भोंडे

  जिल्हयात खाजगी आणि शासकीय रुग्णालयांत कर्करोगाचे किती रुग्ण आढळले याची नोंद ठेवणा-या ‘कॅन्सर रजिस्ट्री’ ची पुण्यात नितांत गरज आहे. ही रजिस्ट्री नसल्यामुळे पुण्यात कर्करोगाचे किती रुग्ण आढळले याची खात्रीशिर नोंद होत नाही. यामुळे कर्करोगाचे किती वाढत आहेत याची शासकीय स्तरावर कोणतेही नोंद उपलब्ध नाही. याअभावी कर्करोगावर मात करण्यासाठी नियोजन करण्यात अडचणी येत आहेत. शहरातील कर्करोगतज्ज्ञांनाही याची गरज भासत असून त्यासाठी शासकीय स्तरावरून प्रयत्न करणे आवशक आहे.

जागतिक कर्करोग दिन म्हणून जगभरात 4 फेब्रुवारी हा दिवस पाळला जातो. त्या धर्तीवर या प्रकारच्या रजिस्ट्रीची गरज भासत आहे. कर्करोगाच्या रुग्णांमध्ये दरवर्षी कित्येक पटीने वाढ होत असल्याचे कर्करोगतज्ज्ञांचे मत आहे.  वीस वर्षापूर्वी 50 नंतर होणारा कर्करोग आता 20च्या व त्याआधीच्या वयोगटातील उंबरठयावर येउन ठेपला आहे. कोणत्याही आजारावर जाणीवपूर्वक मात करायची असेल तर त्याची नोंद हे जिल्हा, शहर आणि राज्यस्तरावर उपलब्ध असने योग्य ठरते. यामधुन त्या आजाराच्या रुग्णांचे प्रमाण, नवीन ट्रेंड याची कल्पना येते. त्याद्वारे हे प्रमाण का वाढत आहे त्याचे शासकीय स्तरावर विश्‍लेषन करता येते. 

   केंद्र व राज्य शासनाने डेंग्यू, स्वाईन फलू, टीबी यासारखे आजार असणारे रुग्ण खाजगी डॉक्टर व रुग्णालयांत जरी आढळले तरी त्याची नोंद शासकीय यंत्रणेकडे होत असल्याने त्यावर उपयायोजना करता येतात. त्यामुळे पुण्यात कॅन्सर रजिस्ट्री असणे आवशक  असल्याचे मत कर्करोगतज्ज्ञांनी व्यक्‍त केले आहे. कॅन्सर रजिस्ट्री ही ‘भारतीय आयुर्विज्ञान अनुसंशाधन परिषद’ (आयसीएमआर) च्या मदतीने काम करते. जिल्हा रुग्णालयाच्या ठिकाणी या रजिस्ट्रीचे काम चालते व संबंधित जिल्हयातील शासकीय आणि खासगी रुग्णालयातील कर्करोगाच्या रुग्णांची नोंद त्यांच्याकडे होते. राज्यात अशा प्रकारच्या रजिस्ट्री मुंबई, वर्धा, बार्शी येथे आहेत. तर कोलकाता, नवीन दिल्‍ली व चेन्नई येथेदेखील आहेत. पुण्यामध्ये जिल्हा रुग्णालयात व ससुन रुग्णालयात कर्करोगाच्या रुग्णांची नोंद होते पण ती फक्‍त शासकीय रुग्णांची असते. खाजगी रुग्णालयांतील नोंद होत नाही आणि बहुतांश रुग्ण हे खासगी रुग्णालयांत उपचार घेतात. शहरातील मोठया रुग्णालयात वर्षाला साधारणतः दोन ते तीन हजार रुग्ण उपचार घेतात.

 -डॉ. गजानन कानिटकर, कर्करोगतज्ज्ञ व शल्यचिकित्सक,  रुबी हॉल क्‍लिनिक 

पुण्यात कॅन्सर रजिस्ट्रीची नितांत आवशकता असून त्यासाठी राज्य शासनाने व सामाजिक संस्थांनी पुढाकार घेणे आवशक आहे. कर्करोगतज्ज्ञांनाही त्याचे महत्व समजले आहे. त्याची स्थापना करण्यासाठी ‘कॅन्सर वॉरियर’ या संस्थेच्या माध्यमातुन प्रयत्न करण्यात येत आहेत.

  -डॉ. साधना तायडे, सहसंचालक , असंसर्गजन्यरोग, सार्वजनिक आरोग्य विभाग 

पुण्यात कॅन्सर रजिस्ट्री नाही. येत्या काळात ‘वैद्यकिय आस्थापना कायदा’ आल्यानंतर त्यातील तरतुदीनुसार ही रजिस्ट्री स्थापन करण्यात येईल. तसेच कॅन्सर हा नोटिफायेबल डिसीजदेखील करण्यात येणार आहे.