होमपेज › Pune › आमदार टिळेकर यांच्यासह इतरांवर गुन्हा दाखल करा

आमदार टिळेकर यांच्यासह इतरांवर गुन्हा दाखल करा

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

पुणे  : प्रतिनिधी 

तरुणाचे अपहरण करून पिस्तुलाचा धाक दाखवून मारहाण केल्याप्रकरणात लष्कर न्यायालयातील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी जे. एस. कोकाटे यांनी आमदार योगेश टिळेकर यांच्यासह इतरांवर गुन्हा दाखल करून तपास करण्याचे आदेश पोलिसांना दिले आहेत.  योगेश लक्ष्मण कामठे (32, रा. कोंढवा बुद्रुक, भोलेनाथ चौक) यांनी आमदार योगेश पुंडलिक टिळेकर, त्यांचे बंधू चेतन पुंडलिक टिळेकर (दोघेही रा. टिळेकर हाऊस, कोंढवा बुद्रुक), आनंद देशमुख (रा. लक्ष्मीनगर, कोंढवा बुद्रुक), गणेश मेमाणे व त्यांचे इतर पाच ते 6 साथीदारांविरुध्द न्यायालयात अ‍ॅड. विजयसिंह ठोंबरे यांच्यामार्फत खासगी तक्रार दाखल केली होती. 

दाखल तक्रारीनुसार, योगेश कामठे यांचा मित्र अतुल गीते यांना आमदार योगेश टिळेकर यांचा बंधू चेतन टिळेकर यांनी घरी बोलावून मारहाण केली होती. योगेश कामठेच्या आई-वडिलांनाही जिवे मारण्याचा प्रयत्न केला होता.  परंतु, कोंढवा पोलिस गुन्हा दाखल करत नव्हते. त्यानंतर 1 मार्च 2018 रोजी महेश कामठे, ओंकार भोसले, अतुल हे पोलिसांत फिर्याद देण्यासाठी गेले होते. तेथे त्यांना आमदार टिळेकर यांचा अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करणार फोन आला. त्यांनी योगेश कामठे यांना गुन्हा दाखल झाला तर तुला खानदानासकट संपवितो अशी धमकी देण्यात आली. त्यानंतर योगेश कामठे यांचे फोर्च्युनरमधून चेतन टिळेकर व त्याच्या साथीदारांनी अपहरण केले.

डोक्याला पिस्तूल लावून धमकावल्याचे तसेच डोक्यात जड वस्तूने मारहाण केल्याचे तक्रारीमध्ये नमूद करण्यात आले होते.  तसेच या प्रकारामध्ये तक्रारदारांना जिवे मारण्याचा प्रयत्न झाला आहे. गुन्ह्यात वापरलेले हत्यार हस्तगत करणे गरजेचे आहे, यामध्ये पोलिस तपास हाणे गरजेचे आहे. पोलिसांनी यामध्ये कोणतीही तक्रार न घेतल्याने न्यायालयाचा दरवाजा ठोठावण्याची वेळ आली असल्याचे अ‍ॅड. विजयसिंह ठोंबरे यांनी न्यायालयाला सांगितले. त्यानुसार न्यायालयाने या प्रकरणी गुन्हा दाखल करून तपास करण्याचे आदेश कोंढवा पोलिसांना दिले आहेत.
 


  •