होमपेज › Pune › तरुणीला लाथा-बुक्क्यांनी मारहाण; पुण्यातील खळबळजनक घटना

पुणे: नोकरी सोडत नसल्याने तरुणीला लाथा-बुक्क्यांनी मारहाण

Published On: Dec 10 2017 1:21AM | Last Updated: Dec 10 2017 10:27AM

बुकमार्क करा

पुणे : प्रतिनिधी

वाकड परिसरात एका कंपनीत नोकरी करणार्‍या तरुणीला नोकरी सोडण्यासाठी लाथा बुक्क्यांनी मारहाण करत धमकाविण्यात आल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. पीडित तरुणीला लाथा बुक्क्यांनी मारहाण करण्यात आल्यानंतरही या गंभीर प्रकरणाची पोलिसांकडून सुरूवातीला दखल घेतली नसल्याचे सांगण्यात आले आहे. आयटी क्षेत्रात नोकरी करणार्‍या महिलांच्या सुरक्षेसाठी वेगवेगळे अ‍ॅपच्या माध्यमातून उपाययोजना राबविण्यात येत असल्या तरी दुसरीकडे मात्र वेगळेच चित्र पाहिला मिळत आहे. मारहाणीसारखा गंभीर प्रकार होऊनही पोलिसांकडून आरोपीविरूध्द केवळ विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

याप्रकरणी अक्षय लेंगुटे (24, रा. चिंचवड) याच्यावर वाकड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी 22 वर्षीय पीडित तरुणीने फिर्याद दिली आहे.  पोलिसांकडून याप्रकरणी विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  पीडित तरुणी वाकड परिसरातील एका कंपनीत नोकरीस आहे. तर, आरोपी अक्षयही त्याच कंपनीत नोकरीस होता. त्यामुळे त्यांची ओळख होती. दरम्यान त्याने दीड महिन्यापूर्वी येथील नोकरी सोडली आहे. मात्र, तेव्हापासून तो तरुणीकडे येथील नोकरी सोडून द्यावी, यासाठी दगादा लावत होता. मात्र, तरूणी नोकरी सोडत नव्हती. त्यानंतर तरुणाने तिला नोकरी सोडण्यासाठी धमकावण्यास सुरूवात केली. तसेच, तिचा पाठलाग सुरू केला. तरीही तरूणी त्याला जुमानत नव्हती. त्याला तिने त्रास न देण्याची विनंती केली. 

त्यानंतरही तरुणाचे धाडस दिवसेंदिवस वाढत गेले. तरुणाने दि. 8 डिसेंबर रोजी कंपनीत जाऊन तरूणीला नोकरी सोडावी, यासाठी लाथा बुक्क्यांनी मारहाण केली. तसेच, तिला धमकावले. त्यानंतर तरुणीने या  त्रासाला कंटाळून पालकांना माहिती दिली. त्यानंतर पालक आणि पीडित तरुणीने पोलिसांकडे धाव घेतली. मात्र, पोलिसांकडून प्रथम दखल घेण्यात आली नाही. पोलिस ठाण्यात गेल्यानंतर देखील पीडित तरूणीची तात्काळ तक्रार घेण्यात आली नाही. तरूणीला आरोपीने लाथा बुक्क्यांनी मारहाण केली असताना देखील पोलिसांनी केवळ विनयभंगाचा गुन्हा दाखल केला असल्याचे पीडितेच्या पालकांनी सांगितले. आरोपीने तरूणीला केलेल्या मारहाणीचे सर्व चित्रीकरण कंपनीच्या परिसरात असलेल्या सीसीटीव्हीत कैद झाले असल्याचेही त्यांनी सांगितले आहे. 

शहरातील महिलांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून पोलिस आयुक्त रश्मी शुक्ला यांनी वेगवेगळे अ‍ॅप जारी केले आहेत. मात्र, तरूणीला मारहाण झाल्यानंतर देखील पोलिसांकडून त्याची तात्काळ दखल घेतली जात नसल्याचे या प्रकारावरून समोर आले आहे. अलिकडील काळामध्ये महिलांच्या सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. त्यामुळे  प्रत्येक शाळा आणि महाविद्यालयात जाऊन मार्गदर्शन केले जात आहे.  दररोज घडणार्‍या घटना आणि चक्क एका कंपनीत नोकरी करणार्‍या तरुणीला तिच्याच सहकार्‍याकडून लाथा बुक्क्यांनी मारहाण झाल्यानंतर देखील तिची प्रथम दखलच न घेतल्याने आश्‍चर्य व्यक्त होत आहे. दरम्यान, पोलिसांनी आरोपीविरूध्द केवळ विनयभंगाचाच गुन्हा दाखल केला. मारहाणीचा का नाही असा प्रश्‍न निर्माण झाला आहे. पीडिता ज्या कंपनीत कामाला आहे त्या कंपनीच्या वतीने देखील आरोपीविरूध्द तक्रार देण्यात आली असल्याचे सांगण्यात आले आहे; पण त्याची अद्यापही दखल घेण्यात आलेली नसल्याचे समोर येत आहे.  आरोपीविरुद्ध गुन्हा रं.नं. 692-1017 नुसार कलम 354 ड नुसार दाखल करण्यात आला आहे.