Tue, Mar 19, 2019 12:13होमपेज › Pune › प्लम, मार्झीपॅन, ग्वाआ चीज केकला विशेष पसंती

प्लम, मार्झीपॅन, ग्वाआ चीज केकला विशेष पसंती

Published On: Dec 24 2017 1:46AM | Last Updated: Dec 24 2017 12:01AM

बुकमार्क करा

पुणे : प्रतिनिधी

प्रभू येशूचा जन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यासाठी बाजारात विविध प्रकारचे केक उपलब्ध झाले आहे. खास नाताळानिमित्त तयार करण्यात आलेल्या प्लम केक, मार्झीपॅन केक आणि ग्वाआ चीजकेकला ख्रिश्‍चन बांधवांची विशेष पसंती मिळत आहे. मागील वर्षीच्या तुलनेत यंदा मागणीत दुपटीने वाढ झाली असून त्याला कंपन्या आणि कॉन्व्हेंट स्कूल्समधून मोठी मागणी होत आहे. परिणामी, उत्पादन वाढवावे लागले असल्याची माहिती बेकरी व्यावसायिकांनी दिली. 

    ख्रिश्‍चन बांधवांची आवड निवड लक्षात घेऊन खास नाताळासाठी मागणीनुसार विशिष्ट प्रकारचे विविध केक तयार करण्यात येतात. यामध्ये प्लम केक, मार्झीपॅन केक, ग्वाआ चीजकेकसह सांताक्लॉजची प्रतिकृती, ख्रिसमस ट्री तसेच फ्रेश क्रीम, चॉकलेट ब्राउनी केक, प्लम हनी केक, मिक्स फ्रूट केक, रिअल प्लम, रीच प्लम, स्टार केक, स्टोलन ब्रेडआदींनाही विशेष मागणी राहते. सद्यस्थितीत ब्लॅक फॉरेस्ट केक, मिक्स फ्रूट, वेडिंग, चॉकलेट मड, अ‍ॅनिव्हर्सरी, थीम केक यांसारखे शंभरावर केकचे प्रकार ऑर्डरनुसार बनवून मिळतात. त्यांची किंमत आकर्षक फ्लेवर्स, वजन तसेच डिझाईननुसार ठरते. ख्रिसमससाठी 270 रुपयांपासून केक उपलब्ध असून प्लमकेकची 1 हजार ते 1 हजार 200 रुपये प्रतिकिलो दराने विक्री करण्यात येत आहे.

याखेरीज, शुद्ध शाकाहारींसाठी अंड्याचा वापर न करता तयार केलेले केकही बेकर्‍यांमध्ये उपलब्ध असल्याची माहिती विक्रेते अजिंक्य कोळेकर यांनी दिली. खास ख्रिसमससाठी सान्ताक्लॉज, ख्रिसमस ट्री, जिंगल बेल अशा स्वरुपामध्ये ही चॉकलेटस् तयार करण्यात आली आहेत. याबरोबरच काही दुकानांमध्ये होम मेड चॉकलेट्सही उपलब्ध असल्याचेही त्यांनी सांगितले.