Thu, Apr 25, 2019 21:59होमपेज › Pune › पुणेकरांच्या उशाला टेमघर धरणाचा ‘बॉम्ब’

पुणेकरांच्या उशाला टेमघर धरणाचा ‘बॉम्ब’

Published On: Feb 05 2018 1:55AM | Last Updated: Feb 05 2018 1:55AMपुणे : प्रतिनिधी

टेमघर धरण म्हणजे पुणेकरांच्या उशाला ठेवलेला ‘बॉम्ब’ असून, तो केव्हाही हजारो पुणेकरांच्या जिवावर बेतू शकतो, असा गंभीर इशारा टेमघरशी संबंधित तीन कर्मचारी संघटनांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लेखी निवेदनासह दिला आहे.  टेमघर धरणाचा ‘बॉम्ब’ फुटून कधीही मोठा अनर्थ घडू शकतो, असे नमूद करताना या संघटनांनी टेमघर धरणाच्या गळतीमागे आणि दुरुस्तीचे काम सोपविलेल्या अधिकार्‍याच्या अचानक बदलीमागे गौडबंगाल असल्याचे सूचित केले आहे. दुरुस्तीचे काम गुणवत्तापूर्वक करणारे अधीक्षक अभियंता ह. तु. धुमाळ यांची बदली केवळ 13 महिन्यांत करण्याचे नेमके प्रयोजन काय आहे, असा सवाल या कर्मचारी संघटनांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांच्याकडे केला आहे. त्यांची बदली रद्द करावी, अशी मागणी त्यांनी मुख्यमंत्र्यांना पाठविलेल्या निवेदनात केली आहे. त्यावर 136 अधिकारी आणि कर्मचार्‍यांच्या स्वाक्षर्‍या आहेत.

टेमघर धरण गळती प्रकरण हा देशभर चर्चेचा विषय झाला होता. त्यामुळे या धरणाचे काम गुणवत्तापूर्ण व्हावे यासाठी 13 महिन्यांपूर्वी अधीक्षक अभियंता ह. तु. धुमाळ यांची तेथे नियुक्ती करण्यात आली होती. धुमाळ यांनी पदभार स्वीकारल्यापासून ते कंत्राटदाराकडून नियमानुसार काम करून घेत होते. त्यामुळे कंत्राटदाराच्या दबवाला बळी पडून धुमाळ यांची 30 जानेवारीला बदली करण्यात आली आणि गेल्या चार महिन्यांपासून रिक्त असलेल्या कुकडी मंडळाचे अधीक्षक अभियंता म्हणून त्यांना नियुक्त करण्यात आले, असा आरोप  राज्य जलसंपदा कर्मचारी संघटना, राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना आणि राज्य रेखाचित्र शाखा कर्मचारी संघटना यांनी केला आहे. 

या तिन्ही संघटनांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांना पाठविलेल्या निवेदनात, धुमाळ हे निविदा शर्ती व अटींच्या अधीन राहून, ठेकेदारांकडून कामाची गुणवत्ता राखत होते. तसेच धुमाळ यांनी गुंजवणी प्रकल्पावर बंद नलिकेच्या संकल्पनेतून शासनाची 177 कोटींची बचत केली. अशा अधिकार्‍याची  तडकाफडकी बदली कोणत्या निकषाच्या अधारे केेली आहे, असा सवाल संघटनांनी मुख्यमंत्री फडणवीस यांना विचारला आहे.