Sun, Apr 21, 2019 01:57होमपेज › Pune › शिक्षकांच्या बदल्या अखेर रद्द

शिक्षकांच्या बदल्या अखेर रद्द

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

पुणे : प्रतिनिधी 

शिक्षक संघटनांच्या दबावापुढे शासन अखेर झुकले असून, शासनाने सपशेल माघार घेतली आहे. कारण जिल्हा परिषद शिक्षकांच्या जिल्ह्यांतर्गत बदल्या यंदा अखेर रद्द केल्या असून, या बदल्या आता  मे 2018 मध्येच होणार आहेत. शुक्रवारी झालेल्या बदल्यांसंदर्भातील व्हिडिओ कॉन्फरन्समध्ये ग्रामविकास विभागाचे सचिव असिम गुप्ता यांनी दिल्याची माहिती सूत्रांनी दिली.

राज्यातील जिल्हा परिषद शिक्षकांच्या जिल्हांतर्गत बदल्यांसदर्भात 27 फेब्रुवारीच्या नवीन शासन निर्णयाप्रमाणे बदली करण्याचा निर्णय शासनाने घेतला होता; परंतु या निर्णयामुळे शिक्षक संघटनांमध्ये दुर्गम तसेच सुगम असे दोन गट पडले. आणि संघटनांमध्ये वादाला तोंड फुटले सुगम गटाला बदल्या नको होत्या, तर दुर्गम भागाला मात्र बदल्या हव्या होत्या. यातूनच सुगम भागातील शिक्षकांची संख्या जास्त असल्यामुळे संघटनेच्या माध्यमातून त्यांनी शासनावर दबाव आणला व बदल्यांना स्थगिती मिळवली आहे.

परंतु यासंदर्भात शुक्रवारी झालेल्या व्हीडीओ कॉन्फरन्समध्ये ग्रामविकास सचिव असिम गुप्ता यांनी जिल्हाअंतर्गत बदली संदर्भात न्यायालयीन प्रक्रियेमुळे झालेला विलंब, जिल्हास्तरावरून भरलेल्या माहिती मधील चुका दुरुस्त करण्यासाठी लागलेला वेळ यामुळे चालू शैक्षणिक वर्ष संपत आले तरी बदली प्रक्रिया पूर्ण होऊ न शकल्याने तसेच पुढील शैक्षणिक वर्षाच्या जिल्हाअंतर्गत बदली प्रक्रियेला देखील या वर्षीप्रमाणे वेळ होऊ नये म्हणून बदली प्रक्रिया त्वरित सुरू करावयाची असल्याने दोन शैक्षणिक वर्षांच्या जिल्हाअंतर्गत बदली प्रक्रिया मधील कालावधी अतिशय कमी राहील. त्यामुळे बदल्या रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याचे सांगितले. तसेच या वर्षी जिल्हाअंतर्गत बदली प्रक्रिया पार पडली नाही. म्हणजे यानंतर प्रक्रिया पार पडणार नाही आणि 27/02 चा शासन निर्णय रद्द केला जाईल. किंवा त्यात काही बदल केला जाईल तसेच इतर कोणत्याही बाह्यशक्तीमुळे अशा प्रकारे पारदर्शी बदली होणार नाही असे कोणास वाटत असेल तर तो गैरसमज असल्याचे सांगितले.

शिक्षक बदली हा विषय आपल्या सेवेचा एक अविभाज्य भाग असून त्याला अधिक महत्व न देता आपल्या शाळेतील विद्यार्थ्यांच्या प्रगतीकडे अधिक लक्ष केंद्रीत करावे अशा सूचना शिक्षकांना दिल्या. 2017-18 हे शैक्षणिक वर्ष संपण्यापूर्वी संगणक प्रणालीद्वारे बदली झालेल्या सर्व शिक्षकांच्या बदलीचे आदेश देण्यात येणार असून 1 मे 2018 ला बदली झालेल्या सर्व शिक्षकांना आपल्या जुन्या शाळेतून कार्यमुक्त करण्यात येऊन नवीन शाळेत हजर करून घेतले जाणार आहे. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत मानवी हस्तक्षेप विरहीत व उच्च आणि सर्वोच्च न्यायालयाने देखील कायम केलेली शासनाची धोरणात्मक बदली प्रक्रिया राबविण्यातच येणार असल्याचा इशारा दिला आहे. त्यामुळे आत्ता जरी बदल्यांचे वादळ शमले असले तरी येत्या काही महिन्यातच ते पुन्हा घोंगावणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.