Sun, Jul 21, 2019 07:48होमपेज › Pune › ‘ऑफलाइन’च्या आदेशामुळे शिक्षक राहणार पगारापासून वंचित

‘ऑफलाइन’च्या आदेशामुळे शिक्षक राहणार पगारापासून वंचित

Published On: Feb 06 2018 2:09AM | Last Updated: Feb 06 2018 1:57AMपुणे : प्रतिनिधी 

शालार्थ प्रणाली बंद पडल्यामुळे राज्यातील शिक्षक तसेच शिक्षकेतर कर्मचार्‍यांचे पगार ऑफलाइन करण्याचे आदेश राज्याच्या उपसचिव चारूशीला चौधरी यांनी नुकतेच दिले आहेत. परंतु हे आदेश देत असताना, ज्या शिक्षकांचा डिसेंबर महिन्याचा पगार शालार्थमधून दिला आहे त्याच शिक्षकांचा जानेवारी महिन्याचा पगार डिसेंबर महिन्याच्या वेतनाच्या आधारे देण्यास सांगितले आहे. परंतु पन्नास ते साठ टक्के शिक्षकांचे नोव्हेंबर तसेच डिसेंबर महिन्याचेच पगार झाले नसल्याचे उघडकीस आले आहे. त्यामुळे हे शिक्षक या आदेशामुळे पगारापासून वंचित राहणार आहेत. 

शालार्थ प्रणालीवरून तब्बल 5 लाख 70 हजार शिक्षक, तसेच शिक्षकेतर कर्मचार्‍यांचे पगार ऑनलाइन काढण्यात येतात. त्यामुळे प्रणाली बंद झाल्याचा फटका या सर्वच कर्मचार्‍यांना बसण्याची शक्यता होती. याचसाठी चारूशीला चौधरी यांनी ज्या शिक्षकांचे डिसेंबर महिन्याचे पगार शालार्थमधून दिले आहेत त्या शिक्षकांचे जानेवारी महिन्याचे पगार डिसेंबर महिन्याच्या वेतनाच्या आधारे देण्यात यावेत, ज्या कर्मचार्‍यांनी डिसेंबर महिन्यात स्वेच्छानिवृत्ती घेतली आहे, तसेच सेवानिवृत्त झाले आहेत किंवा अन्य कारणांमुळे सेवेतच नाहीत, अशा कर्मचार्‍यांची नावे जानेवारी महिन्याच्या वेतन देयकातून वगळावी, डिसेंबर महिन्याच्या वेतन देयकानुसार वेतन भत्ते परिगणित करून वेतन देयक सादर करावे, अशा सूचना प्राथमिक तसेच माध्यमिकच्या संचालकांना दिल्या होत्या.

परंतु अनेक शिक्षक तसेच शिक्षकेतर कर्मचार्‍यांचे नोव्हेंबर तसेच डिसेंबर महिन्याचे पगार देण्यात आलेले नाहीत. त्यामुळे हे कर्मचारी डिसेंबरच्या शालार्थमधून देण्यात येणार्‍या वेतनाच्या यादीत आलेच नाहीत. याबाबत प्राथमिक तसेच माध्यमिकच्या संचालकांनी राज्याच्या उपसचिवांना कळविणे अपेक्षित असताना त्यांनी मात्र उपसचिवांनी दिलेल्या आदेशाची अंमलबजावणी करण्याचे आदेश संबंधितांना दिले आहेत. त्यामुळे नोव्हेंबर तसेच डिसेंबर महिन्यात पगार न मिळालेले कर्मचारी मात्र अडचणीत येणार आहेत.