Thu, Apr 25, 2019 07:29होमपेज › Pune › ‘जलयुक्‍त’ ठरतेय ‘उपयुक्‍त’

‘जलयुक्‍त’ ठरतेय ‘उपयुक्‍त’

Published On: Mar 06 2018 1:02AM | Last Updated: Mar 06 2018 12:07AMपुणे : दिगंबर दराडे

राज्याला टँकरमुक्त करण्यासाठी सुरू केलेल्या जलयुक्त शिवार अभियानाचे सकारात्मक परिणाम दिसून येत आहेत. राज्यात काही ठिकाणी टँकर सुरू झाले आहेत; त्यांची संख्या सुमारे 238 आहे. मात्र मार्च उजाडला तरी सातारा जिल्ह्यातील एका टँकरचा अपवाद वगळता, पुणे विभागात अद्याप कुठेही टँकर सुरू करण्यात आलेला नाही.  उन्हाच्या झळा वाढू लागल्या तशी पाणीटंचाई तीव्र होऊ लागली आहे. राज्यात आतापर्यंत 257 गावे व 4 वाड्यांना 238 टँकरने पाणीपुरवठा करण्यात येत आहे. आगामी काळात पाणीटंचाईच्या झळा आणखी तीव्र होणार असून मात्र, याला आता पुणे विभाग अपवाद ठरत आहे. पुणे विभागाच्या पाचही जिल्ह्यांत केवळ एकच टँकर सुरू आहे.

गतवर्षी झालेले पर्जन्यमान आणि जलयुक्‍त कामांची किमया आता ठिकठिकाणी दिसून येत आहे.  जलयुक्त शिवारातील विविध कामांमुळे पुणे विभाग टँकरमुक्त झाला आहे. पाणी टंचाईची परिस्थिती लक्षात घेऊन ‘पाणी टंचाईमुक्त महाराष्ट्र 2019’ या योजनेअंतर्गत राज्य शासनाने ‘जलयुक्त शिवार’ अभियान 2014 रोजी सुरू केला. या अभियानांतर्गत राज्यातील दुष्काळग्रस्त भागात अभियानाचा उद्देश सफल झाल्याचे शासकीय अहवालावरून आणि विभागातील सद्यःस्थितीवरून दिसून येत आहे.

या अभियानांतर्गत कंपार्टमेंट बंडिंग, सलग समतल चर, खोल सलग समपातळी चर, मातीनाला बांध, शेततळे, वनतळे, सिमेंट बंधारा दुरुस्ती, पाझर तलाव दुरुस्ती, के. टी. वेअर बंधार्‍यांची दुरुस्ती, विहीर पुनर्भरण, इतर उपचार, साठवण बंधारा, साखळी सिमेंटचा बंधरा, पाझर तलाव आदी कामांवर पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली आणि सोलापूर जिल्ह्यात 482 कोटी 12 लाख रुपये खर्च करण्यात आले आहेत. सोलापूर, सातारा, सांगली, कोल्हापूर आणि पुणे जिल्ह्यातील 54 तालुक्यांमध्ये दुष्काळाची तीव्रता गेल्या वर्षापर्यंत अधिक होती. दुष्काळग्रस्त तालुक्यांमध्ये केलेल्या कामांमुळे पिण्याचा आणि ज्या भागात पाणीसाठवण क्षमता आहे, त्या भागातील शेतीसाठी पाणी मिळणार आहे. गेल्या तीन वर्षापासून दुष्काळी असलेल्या तालुक्यांतील शेकडो गावे, वाडी-तांड्यांना पाणीपुरवठा केला जात होता. टँकरवर कोट्यवधी रुपयांचा खर्च शासनाला करावा लागत होता. जलयुक्तच्या कामामुळे तो यंदा तरी वाचला आहे. 

विभागात जलयुक्तच्या कामामुळे झालेला पाऊस जमिनीत मुरल्याने पाणी पातळीत वाढ झाली. विभागात जलयुक्त शिवार अभियानाअंतर्गत घेण्यात आलेली विविध कामे आणि उपचारामुळे 92 हजार 970 हेक्टर शेतीला आठमाही सिंचन करता येईल, एवढा पाणीसाठा विभागातील जमिनीत जमा झाला आहे. त्यात पुणे जिल्ह्यात 8 हजार 830 हेक्टर, सोलापूर 61 हजार 684 हेक्टर, सातारा 11 हजार 465, सांगली 9 हजार 246 आणि कोल्हापूर जिल्ह्यात 1 हजार 745 हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येऊ शकते. उन्हाचा चटका वाढत असून पाणीटंचाईच्या झळा तीव्र होऊ लागल्या आहेत. 

खडकवासला धरणात 1.41 टीएमसी, पानशेत  7.44 टीएमसी, वरसगाव धरणामध्ये 7.46 टीएमसी पाणीसाठा उपलब्ध आहे. तर टेमघर धरणाचे दुरुस्तीचे काम सुरू असल्याने हे धरण मागील काही महिन्यांपूर्वी रिकामे करण्यात आले आहे. या धरणांमध्ये 55.96 टक्के पाणीसाठा आहे. जलसंपदा विभागाकडून पाण्याचे नियोजन हे 15 जुलैपर्यंत करण्यात येते. साधारणपणे 7 जूनपासून राज्यात पावसाला सुरुवात होते. त्यानंतर हळूहळू पाणलोट क्षेत्रात पाणी साठण्यास सुरुवात होते. 15 जुलैपर्यंत ओढे, नाल्यांद्वारे धरणांमध्ये समाधानकारक पाणी जमा होते. त्यामुळे दरवर्षी 15 जुलैपर्यंत उपलब्ध पाणी वापराचे नियोजन करण्यात येते. खडकवासला प्रकल्पात सध्या 16.31 टीएमसी म्हणजे सुमारे 56 टक्के पाणीसाठा आहे.