Mon, Apr 22, 2019 22:05होमपेज › Pune › तळेगाव लोकलला धुक्यामुळे उशीर, प्रवाशांचे हाल 

तळेगाव लोकलला धुक्यामुळे उशीर, प्रवाशांचे हाल 

Published On: Dec 10 2017 3:26PM | Last Updated: Dec 10 2017 3:26PM

बुकमार्क करा

पुणे: प्रतिनिधी 

पुण्याहून तळेगावला जाणाऱ्या लोकलला दाट धुक्यामुळे रविवारी निघण्यास सुमारे अर्धा तास उशीर झाला. मिळालेल्या माहितीनुसार पुण्याहून तळेगावकरिता सकाळी 6 वाजून 50 मिनिटांनी सुटणारी लोकल धुक्यामुळे नियोजित वेळेत सुटू शकली नाही. देहूरोड, बेगडेवाडी स्थानकाजवळ दाट धुक्यामुळे ही लोकल पुणे स्थानकावरून नियोजित वेळेच्या अर्धा तास उशिरा सुटल्याचे कारण रेल्वे प्रशासनाने दिले आहे. ही लोकल तळेगाव येथे सकाळी 7.40 वाजता पोहोचते. मात्र पुण्यातून तिला सुटण्यास उशीर झाल्याने ती तळेगाव येथे देखील उशिरा पोहोचली. तीच लोकल सकाळी 7.50 वाजता तळेगावहून सुटून पुण्याला येत असल्याने दोन्ही बाजूंच्या प्रवाशांचे प्रचंड हाल झाले व त्यांना मनस्ताप सहन करावा लागला.  

दरम्यान, पुणे ते लोणावळा मार्गावर रविवारी विशेष ब्लॉक ठेवण्यात आल्याने प्रवाशांच्या अडचणीत भरच पडली. पुण्याहून लोणावळ्याकरिता दुपारी 12.15, दुपारी 1 व 3 वाजता सुटणार्‍या लोकल व लोणावळ्याहून पुण्याकरिता सकाळी 11.30, दुपारी 2 व सायंकाळी 4.38 वाजता सुटणार्‍या लोकल रद्द करण्यात आल्याने पुणे-लोणावळा-पुणे दरम्यान प्रवास करणार्‍या प्रवाशांना दिवसभर प्रवासच करता आला नाही. गेल्या महिन्याभरात चिंचवड येथे सिग्नल यंत्रणेत झालेला बिघाड, खडकी येथे लोकलमध्ये निर्माण झालेल्या तांत्रिक बिघाडासह अनेकदा लोकल रद्द करण्याची नामुष्की मध्य रेल्वेच्या पुणे विभागावर ओढवली आहे. दरम्यान, लोकलला वारंवार होणार्‍या विलंबामुळे व अचानक रद्द करण्यात येणार्‍या फेर्‍यांमुळे प्रवासी चांगलेच संतप्त झाले असून काही प्रवाशांनी तीव्र शब्दात आपली नाराजी व्यक्त केली आहे.