Sat, Nov 17, 2018 14:43



होमपेज › Pune › सूत्रधार शोधून कडक कारवाई करा

सूत्रधार शोधून कडक कारवाई करा

Published On: Jan 04 2018 2:03AM | Last Updated: Jan 04 2018 2:00AM

बुकमार्क करा




पुणे ः प्रतिनिधी

वढू बुद्रुक आणि कोरेगाव-भीमा येथे घडलेल्या दंगलीचा निषेध करीत असून, या दंगलीचे मुख्य सूत्रधार शोधून त्यांच्यावर शासनाने त्वरित कारवाई करावी. तसेच या दंगलीत मृत पावलेल्या तरुणाच्या कुटुंबाला 25 लाख रुपयांची मदत करावी, अशी मागणी सकल मराठा क्रांती मोर्चा, पुणे जिल्ह्याच्या वतीने करण्यात आली आहे. सकल मराठा क्रांती मोर्चा पुणे जिल्ह्याच्या वतीने बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीनंतर सकल मराठा समाजाच्या समन्वयकांनी ही माहिती पत्रकार परिषदेत दिली. या वेळी मोर्चाचे समन्वयक शांताराम कुंजीर, राजेंद्र कोंढरे, तुषार काकडे, धनंजय जाधव यांसह कार्यकर्ते उपस्थित होते. सकल मराठा क्रांती मोर्चाचे पुण्यातील 

समन्वयक वढू गावामध्ये जाऊन दोन्ही समाजांसोबत बैठक घेणार आहेत. मराठा-दलित अशी जातीय दंगल माजविण्याचा प्रयत्न करण्यात आला असून, दोन्ही समाजाच्या नागरिकांनी शांततेत घ्यावे. महाराष्ट्र बंदला प्रतिसाद चांगला मिळाला असला तरी झालेल्या हिंसाचाराचा सकल मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने निषेध करण्यात येत आहे. वढू येथे गणपत गायकवाड यांच्या समाधीजवळ फ्लेक्स उभारण्यात आला होता. ज्यावरून वाद सुरू झाला त्या वादग्रस्त बोर्डवरील मजकुराची सत्यता इतिहास तज्ज्ञांमार्फत तपासली जावी, अशी आग्रही भूमिका असून वढू गावातील ग्रामस्थांवर दाखल करण्यात आलेले अ‍ॅट्रॉसिटीचे गुन्हे मागे घेण्यासाठी आगामी काळात प्रयत्न करण्यात येणार आहेत. दोन्ही समाजात सलोखा राहावा यासाठी सकल मराठा क्रांती मोर्चा प्रयत्न करेल, असेही कोंढरे यांनी सांगितले.

कोरेगाव-भीमा येथे घडलेल्या दंगलीत मृत्युमुखी पडलेल्या   मराठा युवकाच्या कुटुंबाला  25 लाख रुपये शासकीय मदत मिळावी, अशी मराठा क्रांती मोर्चाची मागणी आहे. या दंगलीत युवकाला ठेचून मारण्यात आले असून त्याच्या खुन्यांना कठोर शासन झाले पाहिजे. कोरेगाव-भीमा आणि नगर रस्त्यावरील नागरिकांच्या मालमत्तेचे प्रचंड नुकसान झाले आहे. त्या सर्व समाजाच्या लोकांना नुकसानभरपाई मिळाली पाहिजे. सर्वच दंगलखोरांवर कठोर कारवाई करावी, अशी मराठा मोर्चाची मागणी आहे.

ग्रामस्थांनी पूर्वकल्पना दिल्यानंतर पोलिस प्रशासनाने योग्य ती खबरदारी घेणे आवश्यक होते. परंतु, त्याबाबत पोलिस प्रशासनाकडून हलगर्जीपणा करण्यात आला असून अशा पोलिस अधिकार्‍यांवर योग्य ती कारवाई झाली पाहिजे. सोशल मीडियाद्वारे  जातीय तेढ निर्माण करणार्‍यांवर कारवाई करावी. तसेच मराठा समाजबांधवांनीही राज्यघटनेचा आदर ठेवून शांतता बाळगावी. आत्तापर्यंत मराठा समाजाच्या वतीने 58 मोर्चे शांततेमध्ये काढण्यात आलेले होते. परंतु, कोणत्याही प्रकारचा हिंसाचार झालेला नाही. आजच्या महाराष्ट्र बंदमध्ये घडलेल्या काही घटनांचा निषेध करीत असून, दोषींवर कडक कारवाई करावी, अशी मागणीही कुंजीर यांनी या वेळी केली.