Tue, Jul 16, 2019 01:45होमपेज › Pune › पुरंदर विमानतळासाठी दोन हजार ४०० हेक्टर जमीन घेणार

पुरंदर विमानतळासाठी दोन हजार ४०० हेक्टर जमीन घेणार

Published On: Jan 05 2018 1:23AM | Last Updated: Jan 05 2018 1:03AM

बुकमार्क करा
पुणे : प्रतिनिधी 

पुण्यासाठी पुरंदर येथील प्रस्तावित छत्रपती शिवाजीमहाराज आंतरराष्ट्रीय विमानतळासंदर्भात हवाई दलाने उपस्थित केलेल्या तांत्रिक मुद्यांवर एअरपोर्ट अ‍ॅथॉरिटी ऑफ इंडियाने (एएआय) संरक्षण विभागाकडे अहवाल सादर केला आहे. त्यामुळे विमानतळाला लवकरच मान्यता मिळण्याची शक्यता असून विमानतळासाठी दोन हजार 400 हेक्टर जमीन संपादित करण्याची प्रक्रिया राबविली जाणार आहे, अशी माहिती अतिरिक्त जिल्हाधिकारी रमेश काळे यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत दिली आहे.सिद्धी 2017 ते संकल्प 2018 याविषयी माहिती देण्यासाठी आयोजित  पत्रकार परिषदेमध्ये ते बोलत होते.संरक्षण विभागाने सुरक्षितेसंबंधी पुरंदर येथील प्रस्तावित विमानतळावरून विनाअडथळा विमानोड्डाणासह काही तांत्रिक अडचणीसंदर्भात एअरपोर्ट अ‍ॅथॉरिटी ऑफ इंडियाकडून अहवाल मागविला होता.

 विमानतळासाठी शासनाने पुरंदर येथील जागा निश्‍चित केली आहे. पुरंदर विमानतळासाठीचा प्रस्ताव शासनाने संरक्षण विभागाकडे पाठविला होता. एअरपोर्ट अ‍ॅथॉरिटी ऑफ इंडियाकडून तयार करण्यात आलेल्या प्रस्तावात संरक्षण मंत्रालयाने काही त्रुटी काढल्या असून त्यांची पूर्तता करण्यासाठी वरिष्ठ अधिकार्‍यांच्या तीन-चार बैठका झाल्या आहेत. आणीबाणीच्या वेळेस पुरंदर येथील विमानतळामुळे लोहगाव विमानतळावरून लष्कराच्या विमान उड्डाणास काही अडथळे निर्माण होऊ शकतात का, अशी शंका संरक्षण मंत्र्यांकडून उपस्थित करण्यात आली होती. त्यावर यासंदर्भात अहवाल तयार करून सादर करण्याचे आदेश संरक्षण विभागाने यांनी एअरपोर्ट अ‍ॅथॉरिटी ऑफ इंडिया दिले होते. 

याविषयी माहिती देताना काळे म्हणाले, एअरपोर्ट अ‍ॅथॉरिटीने या तांत्रिक मुद्यांचे विश्‍लेषण करून त्याच अहवाल संरक्षण विभागाला सादर केला आहे. संरक्षण विभागाच्या निर्णयानंतर विमानतळासाठीची पुढील प्रक्रिया सुरू करण्यात येईल. विमानतळासाठी सुमारे 2 हजार 400 हेक्टर जागा आवश्यक असून चार किलोमीटरच्या दोन धावपट्या असणार आहेत. प्रस्तावित विमानतळासाठी आवश्यक असलेली जमीन विमानतळाला परवानगी मिळाल्यानंतर जमीन संपादीत करण्याची प्रक्रिया राबविली जाणार असल्याचे काळे यांनी सांगितले.   यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र मुठे, जिल्हा माहिती अधिकारी राजेंद्र सरग उपस्थित होते.