Sat, Jul 20, 2019 10:41होमपेज › Pune › स्वारगेट मल्टिमॅाडेल हब लवकरच  

स्वारगेट मल्टिमॅाडेल हब लवकरच  

Published On: Feb 11 2018 1:35AM | Last Updated: Feb 11 2018 1:13AMपुणे : प्रतिनिधी 

स्वारगेट येथील बहुचर्चित मल्टिमॅाडेल हबला आता लवकरच सुरुवात होणार आहे. 7 फेब्रुवारीला (बुधवारी) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर या मल्टिमॅाडेल हब आराखड्याचे सादरीकरण करण्यात आले, याला त्यांच्याकडून पसंती आल्यामुळे याचे काम सुरू करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. मल्टिमॅाडेल हब आराखड्याच्या सादरीकरण बैठकीस महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक ब्रिजेश दीक्षित, कार्यकारी संचालक रामनाथ सुब्रम्हण्यम, नगरविकास विभागाचे प्रधान सचिव डॉ. नितीन करीर, परिवहन महामंडळाचे उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक रणजितसिंह देओल, पुणे महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त शीतल उगले-तेली, पीएमपीचे माजी अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक तुकाराम मुंढे आदी  उपस्थित होते. 

शहरातील वर्दळीचा भाग समजल्या जाणार्‍या स्वारगेट येथे महामेट्रोचे नियोजित मल्टिमॅाडेल हब होणार आहे. शहरातील मुख्य सार्वजनिक वाहतूक व्यवस्थांना जोडून घेत महामेट्रोकडून हे हब उभारण्यात येणार आहे. पुणे महानगर परिवहन महामंडळ (पीएमपी) आणि राज्य परिवहन महामंडळ ( एसटी) या वाहतूक व्यवस्थेने प्रवास करणार्‍या नागरिकांची या चौकात वर्दळ असते. मेट्रो सुरू झाल्यावर शहरातील अनेक भागांमधून येणार्‍या नागरिकांना या सर्व वाहतूक सेवांचा वापर विनात्रास करता यावा यासाठी

महामेट्रोकडून  हबचा आराखडा तयार करण्यात आला होता.  पिंपरी चिंचवड ते स्वारगेट या मेट्रो मार्गातील स्वारगेट येथे भुयारी मार्गही नियोजित आहे.  या मार्गाला जोडूनच हे हब तयार होणार आहे. भुयारी मार्ग, एसटी आणि पीएमपी ही सर्व स्थानके भुयारी पादचारी मार्गाने जोडण्यात येणार आहेत. पादचारी, सायकल वापरणारे यांचाही या आराखड्यात विचार करण्यात आला आहे.