Mon, Jun 17, 2019 19:06होमपेज › Pune › सरोगसी प्रकरण सनी लिओनीला भोवणार 

सरोगसी प्रकरण सनी लिओनीला भोवणार 

Published On: Mar 16 2018 6:55PM | Last Updated: Mar 16 2018 7:12PMपुणे : महेंद्र कांबळे  

अभिनेत्री सनी लिओनीला सरोगसी प्रकरण चांगलेच भोवण्याची शक्‍यता आहे. पहिली मुलगी दत्तक घेतली असतानाही सरोगसीद्वारे दोन जुळ्या मुलांना जन्म दिल्‍याप्रकरणी सनी आणि तिचा पती डॅनिअल वेबर यांच्यावर पुणे येथील न्यायालयात सरोगसी कायदा 2016 नुसार तक्रार दाखल करण्यात आली आहे. 

याबाबत अ‍ॅड. वाजेदखान रहिमखान पठाण (बीडकर) (वय 33, रा. मदणेवस्ती, कोलवडी, ता. हवेली, जि. पुणे ) यांनी चित्रपट अभेनेत्री करणजीत कौर व्होरा उर्फ सनी लिओनी ( वय, 40) आणि तिचा पती डॅनिअल वेबर (46, दोघेही रा. मॅक्झीमम सिटी, अंधेरी वेस्ट, मुंबई, महाराष्ट्र) यांच्या विरोधात शिवाजीनगर येथील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी ए. एस. पानसरे यांच्या न्यायालयात ही तक्रार दाखल केली आहे. 

सनी लिओनी आणि डॅनिअल वेबर यांनी प्रसिध्दी माध्यमाचा वापर करून महाराष्ट्रभर हा गुन्हा घडवला आहे. ज्यांना मुलबाळ नाही अशा दाम्पत्यासाठी सरोगसी कायद्याअंतर्गत सरोगसीव्‍दारे मुल जन्माला घालता येते. पण ज्या दाम्पत्यांनी एखादे मुल दत्तक घेतले असेल अशा स्थितीत सरोगसी करता येत नाही. सनी लिओनी आणि डॅनिअल यांनी लातूर येथील अनाथ आश्रमामधून एक मुलगी दत्तक घेतली. ही मुलगी दत्तक घेतल्यानंतर काही दिवसातच त्यांनी सरोगसी करून दोन मुले जन्माला घातली. त्यांनी कायद्याचा गैरवापर केला आहे. मुलगी दत्तक घेतल्यानंतर संबंधित दत्तक मुलीवर अन्याय होणार नाही याची दक्षता घेतली जाणे आवश्यक होते. सरोगसी केल्यानंतर जन्माला आलेली मुले व दत्तक घेतलेली मुलगी यांच्यात भविष्यात संपत्तीवरून किंवा घरगुती कारणावरून वाद होण्याची शक्यता याचिकेच्या माध्यमातून वर्तविण्यात आली आहे. 

सरोगसी हा वैद्यकीय विषय आहे. परंतु, या विषयाचा गैरफायदा घेत दोघांनी सरोगसी कायदा 2016 चे उल्लंघन केले आहे. सरोगसी मातेचे नाव गुपित ठेवले जाते. त्यामुळे त्यांनी कोणत्या रूग्णालयात सरोगसी केली हे उघड झाले नाही. त्यांनी ज्या ठिकाणी गुन्हा केलेला आहे, ते ठिकाण पोलिसांच्या तपासाशिवाय स्पष्ठ होऊ शकत नाही. याबद्दल तक्रारदारांनी मुंबई येथील अंधेरी पोलिस ठाण्यासह इतर पोलिस ठाण्यात तक्रार देण्याचा प्रयत्न केला, परंतु दोन्हीही ठिकाणी सनी राहत असलेला भाग आमच्या हद्दीत येत नसल्याचे उत्तर अ‍ॅड. वाजेदखान यांना मिळाले. पुण्यातील पोलिस ठाण्यामध्येही याबाबत तक्रार दाखल करण्याचा प्रयत्न तक्रारदारांनी केला परंतु, त्यांना मुले कोठे जन्माला आली, दोघे कोठे राहण्यास आहेत अशी विचारणा करून तक्रार घेण्यात आली नाही. 

या दाम्पत्याने ज्‍यापध्दतीने सरोगसी कायद्‍याचा उल्‍लंघन केले त्‍याप्रमाणे इतर कोणीही करू शकते. सोशल नेटवर्कींग साईट, प्रकाशने यांच्या माध्यमातून त्यांनी प्रसिध्दी केली आहे. त्यामुळे गुन्ह्याची व्याप्ती संपूर्ण महाराष्ट्रभर आहे. पोलिसांकडून ही तक्रार दाखल न झाल्यामुळे तक्रारदारांनी न्यायालयाकडे धाव घेऊन ही याचिका दाखल केली आहे. या दाम्पत्यावर कडक कायदेशीर कारवाई करण्यात यावी, त्यांना योग्य त्या नोटीसा काढण्यात याव्यात, त्यांच्या विरोधात योग्य ते आदेश पारीत करण्यात यावेत. अशी मागणी याचिकेच्या माध्यमातून करण्यात आली आहे. तसेच माहिती तंत्रज्ञान अधिनियम 2000 अन्वये कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे. याप्रकरणावरील पुढील सुनावणी 21 मार्च रोजी होणार आहे.