Mon, Jun 24, 2019 21:00होमपेज › Pune › स्वच्छतेच्या बाबतीत पुणे स्टेशन ‘नापास’

स्वच्छतेच्या बाबतीत पुणे स्टेशन ‘नापास’

Published On: Jun 20 2018 1:15AM | Last Updated: Jun 20 2018 1:10AMपुणे : प्रतिनिधी 

पुणे स्टेशनवरील प्लॅटफॉर्म क्रमांक 1 ते 6 दरम्यान सर्वच प्लॅटफॉर्म गलिच्छ असून ठिकठिकाणी अस्वच्छता प्रकर्षाने जाणवत असल्याचे दै. ‘पुढारी’ने केलेल्या पाहणीतून दिसून आले.  मे 2017 रोजी पुणे रेल्वे स्टेशनला ए-1 कॅटेगरी यादीमध्ये देशातील नववे स्वच्छ स्टेशन म्हणून घोषित करण्यात आले होते. परंतु, स्टेशनची सध्याची अवस्था पाहता याच स्टेशनला स्वच्छतेसाठी नववा क्रमांक मिळाला होता, यावर कोणाचाही विश्‍वास बसणार नाही. 

स्टेशन परिसरात शिरतानाच प्रवाशांना नाक मुरडूनच जावे लागत आहे. यामुळे स्वच्छतेच्या बाबतीत पुणे स्टेशन साफ नापास झाल्याचे दिसते.2015-2016 मध्ये ए-1 कॅटेगरी स्टेशनच्या यादीत पुण्याचा 75 वा क्रमांक होता. मात्र मे 2017 मध्ये जाहीर करण्यात आलेल्या स्वच्छ स्टेशनच्या यादीत पुण्याने गरुडझेप घेत थेट नववा क्रमांक मिळवला. पुढील काही महिने स्टेशनवर स्वच्छता, टापटीप राखली देखील गेली. परंतु गेल्या 5-6 महिन्यांपासून रेल्वेचा स्वच्छतेचा वेग चांगलाच मंदावला असून ठिकठिकाणी घाणीचे साम्राज्य दिसून येते. सर्व पुलांवर प्रवाशांकडून पिचकार्‍या मारण्यात आल्या असून प्लॅटफॉर्म पाच व सहावर प्लॅस्टिकच्या बाटल्या, पिशव्या, केर-कचरा तसेच लोहमार्गावर गटाराचे पाणी साठून दुर्गंधी पसरल्याचे चित्र सध्या आहे.

प्लॅटफॉर्म एकवर ठिकठिकाणी पार्सल ठेवण्यात आले असून त्याच्या भोवती माशा घोंगावताना दिसतात. त्याचप्रमाणे स्वच्छतागृहांच्या वापरासाठी पैसे घेऊनही ती अस्वच्छच असल्याचे दिसते. प्लॅटफॉर्म 2 व 3 येथील छतातून पावसाचे पाणी गळत असून प्रवाशांना अडचणीला सामोरे जावे लागत आहे. दरम्यान, क्वालिटी काउन्सिल ऑफ इंडिया गेल्या 2-3 महिन्यांपासून पुणे स्टेशनवर स्वच्छतेचा सर्व्हे करत असून लवकरच पुणे रेल्वे स्टेशन स्वच्छतेच्या बाबतीत किती पाण्यात आहे, हे आपल्याला कळू शकणार आहे. तूर्तास रेल्वेकडून करण्यात येणारा स्वच्छतेचा दावा साफ चुकीचा असून स्टेशन परिसर अत्यंत घाणेरडे बनले आहे.