Sat, Sep 22, 2018 06:45होमपेज › Pune › पुणे : राज्य शासनाची “संवाद वारी” (Video)

पुणे : राज्य शासनाची “संवाद वारी” (Video)

Published On: Jul 08 2018 5:41PM | Last Updated: Jul 08 2018 5:35PMपुणे : प्रतिनिधी 

माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या वतीने नाविन्यपूर्ण उपक्रम राबविण्यात येत आहे. त्‍याची सुरूवात झाली आहे. या उपक्रमांतर्गत नानापेठेतील चित्ररथ सर्वांचे आकर्षण ठरला आहे. अवघा महाराष्ट्र आता भक्तीमय झाला आहे. ‘ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, तुकाराम’च्या जयघोषात, टाळ-मृदुंगाच्या गजरात आषाढी वारीला सुरुवात झाली असून, श्री संत तुकाराम महाराज पालखी व श्री संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी आज पुण्यात मुक्कामाला आहेत .

मोठ्या संख्येने सहभागी झालेल्या भक्तगणांमुळे अवघा महाराष्ट्र वारीमय झाला आहे. या भक्त मेळ्यात यंदा महाराष्ट्र शासनाचे माहिती व जनसंपर्क महासंचालनालय ‘संवाद वारी’ हा अभिनव उपक्रम घेऊन सहभागी झाले आहे. यातून शासनाच्या अनेकविध योजना, उपक्रम विविध घटकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आहे.

‘संवाद वारी’द्वारे श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा व श्री संत तुकाराम पालखी सोहळा या दोन्ही मार्गावर पालखीच्या मुक्कामाच्या ठिकाणी प्रदर्शन, पथनाट्य, कलापथक उपक्रम आयोजित करण्यात येत आहे. शासनाच्या शेती आणि ग्राम विकासाशी निगडीत विविध योजना, उपक्रमांची माहिती या ‘संवाद वारी’तून दिली जात आहे. गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार, छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना, जलयुक्त शिवार, मागेल त्याला शेततळे, अखंड वीजपुरवठा,गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना, प्रधानमंत्री पीक विमा योजना, मुख्यमंत्री सहाय्यता निधी, बाजार समित्यामध्ये सुधारणा, डिजिटल सात-बारा,उन्नत शेती – समृद्ध शेतकरी, महात्मा फुले जन आरोग्य योजना अशा विविध योजनांच्या माहितीचा यात समावेश आहे.

पंढरपूर येथे आयोजित केल्या जाणाऱ्या पाच दिवसांकरिताच्या भव्य प्रदर्शनात माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या ‘संवाद वारी’ चे दालन असणार आहे. श्री संत तुकाराम महाराज पालखी आणि श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी मार्गावर या ‘संवाद वारी’चे आयोजन करण्यात आले आहे. त्याचा प्रारंभ पुण्यातून झाला असून माहिती उपसंचालक मोहन राठोड यांच्या हस्ते उद्घाटन झाले.यावेळी जिल्हा माहिती अधिकारी राजेंद्र सरग,संग्राम इंगळे,जयंत कर्पे आदी उपस्थित होते . शासनाची महसूल यंत्रणा, महानगरपालिका, नगरपालिका, ग्रामपंचायत, मंदिर व संस्थान यांच्या सहकार्याने ‘संवाद वारी’ चे आयोजन करण्यात आले आहे.