होमपेज › Pune › ‘स्टेमसेल्स’ प्रिझर्व करण्याच्या बहाण्याने महिलेची फसवणूक

‘स्टेमसेल्स’ प्रिझर्व करण्याच्या बहाण्याने महिलेची फसवणूक

Published On: Jan 01 2018 2:02AM | Last Updated: Dec 31 2017 11:22PM

बुकमार्क करा
पुणे : प्रतिनिधी 

डॉ. चैतन्य कॉर्ड लाईफ बायोटेक नावाच्या कंपनीने नवजात बालकाचे भविष्यात होणार्‍या आजारापासून संरक्षण करण्यासाठी त्याच्या नाळेतील रक्त प्रिझर्व्ह (स्टेमसेल्स) करण्याच्या बहाण्याने  महिलेकडून 65 हजार रुपये घेऊन तिची फसवणूक केल्याचा प्रकार कोथरूड परिसरात उघडकीस आला आहे; तर कंपनीचे कार्यालय बंद करून दोघेजण पसार झाले आहेत. यात फसवणुकीचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. 

 स्मिता गोपाल तिजुरी (वय 60, रा. मुकुंदनगर, स्वारगेट) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार डॉ. चैैतन्य पुरंदरे याच्यासह दोन महिलांवर गुन्हा दाखल केला आहे  पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 27 मे ते 2 जून 2008 या कालावधीत स्मिता तिजुरी यांची मुलगी प्रसूतीसाठी स्वारगेट येथील पाटणकर नर्सिंग होम्स येथे दाखल झाली होती. पौड रस्त्यावरील शीलाविहार कॉलनी येथे सुदर्शन अपार्टमेंटमध्ये ‘डॉ. 
चैतन्य कॉर्ड लाईफ बायोटेक’ कार्यालय होते. त्या वेळी त्यांचा विश्‍वास संपादन करून डॉ. चैतन्य पुरंदरे आणि त्याच्या साथीदार यांनी महिलांना ‘स्टेमसेल्स’बद्दल माहिती दिली.

तुमच्या बाळाच्या नाळेतील रक्त प्रिझर्व्ह केल्यास भविष्यात त्याला कोणतेही आजारपण आले तर त्यावर औषध शोधता येऊ शकते; त्यामुळे त्याला संरक्षण मिळेल असे त्यांना सांगितले. त्यानंतर त्यांचा विश्‍वास संपादन करून स्टेमसेल्स प्रिझर्व करण्याच्या बहाण्याने  65 हजार रुपये घेण्यात आले. त्यानंतर तिजुरी यांनी ‘स्टेमसेल्स’बद्दल चौकशी केली नाही. दरम्यानच्या काळात डॉ. चैतन्य कॉर्ड लाईफ बायोटेकचे कार्यालय बंद करण्यात आले. मात्र याबाबत  तिजुरी यांना कळविण्यात आले नाही. काही दिवसांपूर्वी त्यांना  डॉ. चैतन्य पुरंदरेने गाशा गुंडाळल्याचे समजले. त्यानुसार त्यांनी कोथरूड पोलिस ठाण्यात तक्रार  दिल्यानंतर गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी पोलिस निरीक्षक (गुन्हे) शंकर खटके अधिक तपास करत आहेत.