Fri, Apr 26, 2019 18:09होमपेज › Pune › राज्यात ८२.५७ कोटींचे सोयाबीन अनुदान शेतकर्‍यांच्या बँक खात्यावर

राज्यात ८२.५७ कोटींचे सोयाबीन अनुदान शेतकर्‍यांच्या बँक खात्यावर

Published On: Dec 13 2017 2:38AM | Last Updated: Dec 13 2017 1:53AM

बुकमार्क करा

पुणे ः प्रतिनिधी

राज्यात गतवर्षी मुबलक उत्पादनामुळे सोयाबीनचे भाव घसरल्याने शेतकरी अडचणीत आला होता. त्यावेळी राज्य शासनाने संकटातील शेतकर्‍यांना प्रति क्विंटलला 200 रुपये अनुदान देण्याचा निर्णय घेतला. त्या अनुदानाची रक्कम शेतकर्‍यांच्या बँक खात्यावर जमा करण्यात येत आहे. त्यानुसार राज्यातील 2 लाख 69 हजार 824 शेतकर्‍यांना 82 कोटी 57 लाख रुपयांइतक्या अनुदानाचे वाटप करण्यात आल्याची माहिती राज्याचे पणन संचालक डॉ. आनंद जोगदंड यांनी दिली. 

गतवर्षीच्या म्हणजे खरीप हंगाम 2016-2017 मध्ये सोयाबीन पिकाखालील लागवडीत आणि उत्पादनात झालेल्या वाढीमुळे बाजारपेठांमध्ये आवक वाढून दर घटण्यास सुरुवात झाली. त्यामुळे आर्थिक नुकसानग्रस्त शेतकर्‍यांना जास्तीत जास्त पाच हजार रुपये म्हणजेच 25 क्विंटलपर्यंतच्या खरेदीवर अनुदान देण्याचा निर्णय राज्य शासनाने ऑक्टोबर महिन्यात घेतला होता. ऑक्टोबर 2016 ते डिसेंबर 2016 या कालावधीमध्ये कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सोयाबीनची विक्री करणार्‍या शेतकर्‍यांना हे अनुदान देण्यात येणार असल्याचे जाहीर करण्यात आले होते. आकस्मिक निधीतून 108 कोटी 64 लाख 29 हजार रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला होता. त्यापैकी 82 कोटी 57 लाख रुपये शेतकर्‍यांच्या  बँक खात्यावर जमा करण्यात आले असल्याचे डॉ. जोगदंड यांनी स्पष्ट केले. उर्वरित देय अनुदान रक्कमही लवकरच दिली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.

राज्यातील सोयाबीन अनुदानाची जिल्हानिहाय स्थिती रुपयांत पुढीलप्रमाणे. ः  पुणे 8 लाख 13 हजार 170, सोलापूर 2 लाख 69 हजार, सांगली 5 लाख, नाशिक 38 लाख 67 हजार, अहमदनगर 91 लाख 98 हजार, जळगाव 6 लाख, नंदूरबार 19 लाख 89 हजार, औरंगाबाद 3 लाख 92 हजार, जालना 3 कोटी 53 लाख, परभणी 4 कोटी 31 लाख, हिंगोली 1 कोटी, लातूर 17 कोटी, बीड 67 लाख, उस्माणाबाद 49 लाख, नांदेड 2 कोटी 84 लाख, अमरावती 12 कोटी 15 लाख, अकोला 7 कोटी, वाशिम 12 कोटी, बुलढाणा 8 कोटी, यवतमाळ 4 कोटी, नागपूर 1 कोटी 25 लाख, वर्धा 4 कोटी 54 लाख, चंद्रपूर 68 लाख, धुळे 6 लाख, भंडारा 15 हजार.