Mon, May 27, 2019 09:35होमपेज › Pune › पुणे- सोलापूर महामार्गावर अपघात: तीन ठार

पुणे- सोलापूर महामार्गावर अपघात: तीन ठार

Published On: Feb 17 2018 12:11PM | Last Updated: Feb 17 2018 12:11PMयवत : वार्ताहर

पुणे-सोलापूर महामार्गावर वरवंड गावाच्या हद्दीत झालेल्या अपघातात तीन जणांचा जागीच मृत्यू झाला असून यामध्ये उरळी कांचन येथील आई आणि मुलाचा समावेश आहे.

शनिवारी सकाळी आठ वाजता वरवंड (ता. दौंड, जि. पुणे)  गावाजवळ  कवटीचा  मळा परिसरात पुणे-सोलापूर महामार्गावरून उरूळी  कांचन येथील सोमनाथ लक्ष्मण सुतार  (वय २९ )व त्यांच्या आई सुलाबाई लक्ष्मण सुतार (वय ४८) हे नीरा नरसिंहपूर येथे दशक्रिया विधीसाठी आपली दुचाकी (एमएच १२ पीवाय ५४७५) वरून जात होते. यावेळी वरवंड येथील लव्हजी दत्तात्रय दिवेकर (वय ५७ )हे दुचाकी (एमएच ४२ एटी १३६३) वरून महामार्ग ओलांडत असताना दोन दुचाकींची समोरासमोर धडक झाली. यावेळी पाठीमागून येणार्‍या ट्रकने  सोमनाथ सुतार व त्यांची आई सुलाबाई सुतार यांना चिरडल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. यातील जखमी लव्हजी दिवेकर यांना पुढील उपचारासाठी वरवंड येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते मात्र त्यांचाही यावेळी मृत्यू झाला. 

संबंधित घटनेची माहिती मिळताच वरवंड ग्रामस्थांनी अपघात घडलेल्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. घटनास्थळी यवत पोलिसांनी भेट देऊन मृतदेह यवत येथील उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदन साठी आणण्यात आले होते.