होमपेज › Pune › उरळीमध्ये भीषण अपघात; दोघे ठार, विद्यार्थी गंभीर

उरळीमध्ये भीषण अपघात; दोघे ठार, विद्यार्थी गंभीर

Published On: Jan 18 2018 12:17PM | Last Updated: Jan 18 2018 11:39AM

बुकमार्क करा
उरूळी कांचन : वार्ताहर

रस्‍ता ओलांडत असताना प्रवासी वाहतूक करणार्‍या वाहनाला भरधाव ट्रकने उडवून रस्त्यावर उभा असलेल्या दोघांना चिरडले. यामध्ये दोघेजण जागीच ठार झाले. ही घटना गुरुवार दि.१८ रोजी पुणे-सोलापूर महामार्गावरील उरूळी कांचन (ता. हवेली ) येथील तळवाडी चौकात घडली आहे. या अपघातात महाविद्यालयीन विद्यार्थी जखमी झाला असून त्याची प्रकृती चिंताजनक आहे.

दौंड तालुक्यातील बोरीऐंदी येथून उरुळी कांचनकडे प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनातून महात्मा गांधी कनिष्ठ महाविद्यालयातील  सहा विद्यार्थी जात होते. यावेळी रस्‍ता ओलांडत असताना पुण्याहून सोलापूरकडे जाणाऱ्या भरधाव ट्रक (एमएच २६ एडी ३६४९ ) ने प्रवासी वाहतूक (एम.एच.४३ के.१७३) करणार्‍या वाहनाला उडवले. यावेळी रस्तालगत प्रवासासाठी उभा असलेल्या दोघांना ट्रकने  चिरडून रस्तालगत असलेल्या दुकानाला आदळला. वामन धोंडीबा कांचन (वय ८५, रा. उरुळी कांचन ) तर राजू बलेश्वर सिंह ( रा. सध्या उरुळी कांचन ) हे दोघे या अपघातात ठार झाले आहेत. अमोल सुभाष म्‍हेत्रे (वय -१७ रा. बोरीऐंदी, ता. दौंड ) हा विद्यार्थी गंभीर जखमी झाला असून त्याची प्रकृती चिंताजनक आहे. यामध्ये  चालक  व पाच विद्यार्थी जखमी झाले आहेत. जखमींत विद्यार्थिनींचाही समावेश आहे. जखमींना विश्वराज रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. अपघातानंतर सकाळी साडेनऊ वाजेपर्यंत उरुळी कांचनमधील वाहतुकीची तीन तासाहून अधिक काळ कोंडी झाली होती.