Sat, Apr 20, 2019 17:51होमपेज › Pune › वाहतूककोंडीवर स्मार्ट सिग्नलचा उतारा

वाहतूककोंडीवर स्मार्ट सिग्नलचा उतारा

Published On: Jun 20 2018 1:15AM | Last Updated: Jun 20 2018 12:41AMपुणे : नवनाथ शिंदे

सिग्नल बिघाड झाल्यास अथवा वाहतूक कर्मचारी उपलब्ध नसल्यास होणारी वाहतूककोंडी, वाहनचालकांना त्रासदायक ठरते. त्यामुळे वाहतूककोंडी सोडविण्यासाठी शहरातील तब्बल 125 चौकात स्मार्ट सिग्नल यंत्रणा बसविण्यात येणार आहे. अ‍ॅडव्हान्स ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टिमनुसार (एटीएमएस) वाहतूककोंडीला ब्रेक लागणार आहे.

पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरातील वाहतूक सुरळित ठेवण्यासाठी 365 चौकात टायमर सिग्नल यंत्रणा कार्यन्वित आहे. त्यातील 292 सिग्नल पुणे शहरात असून, 73 सिग्नल उद्योगनगरीत बसविण्यात आले आहेत. आता एटीएमएस सिग्नल यंत्रणेचा आधार घेण्यात आला आहे. शहरातील बालगंधर्व चौकातील गंधर्व हॉटेल शेजारी पहिली स्वयंचलीत सिग्नल यंत्रणा बसविण्यात आली होती. त्यामुळे संबधित परिसरातील वाहतूककोंडी टाळण्यास मदत झाली आहे. त्यापार्श्‍वभूमीवर अल्पावधीतच शहरातील विविध चौकात 125 स्मार्ट सिग्नल यंत्रणा बसण्यात येणार आहे.

राज्यातील सर्वाधिक वाहनांची संख्या असलेल्या पुणे शहरात दिवसेंदिवस वाहन खरेदीचा आलेख उंचावत आहे. त्यातच अरुंद रस्ते, अतिक्रमण, बेशिस्त वाहनचालकांमुळे वाहतूककोंडीत अधिकच भर पडत आहे. विशेषतः विविध भागात जाणार्‍या चालकांकडून वाहतूकीच्या नियमांना फाटा देऊन, शॉर्टकट वापरला जातो. त्यामुळे एकाच चौकात अधिकाधिक वाहनांची गर्दी वाढते.  सध्याच्या स्थितीत शहरातील सिग्नल यंत्रणा टायमरवर कार्यन्वित असल्यामुळे वेळ पूर्ण झाल्याशिवाय सिग्नल सुटत नाहीत. त्यामुळे ठिकठिकाणच्या चौकात मोठ्या प्रमाणावर वाहनांची गर्दी होते. डिजीटल बोर्डवर मिळणार लाईव्ह ट्रॉफिक अपडेट स्मार्ट सिटीतंर्गत बसविण्यात येणार्‍या सिग्नल यंत्रणेचे काम टॉमटॉम कंपनीच्या अधिपत्याखाली होणार आहे. तसेच शहरात बसविण्यात आलेल्या 200 डिजीटल बोर्डवर ट्राफिकबाबत लाईव्ह अपडेट दिले जाणार आहे. त्यामुळे वाहनचालकांना इच्छितस्थळी पोहचण्यास वेळेच्या गणिताची जुळवाजुळव करता येणार आहे.