Sun, Jul 21, 2019 16:44
    ब्रेकिंग    होमपेज › Pune › पुण्याला  ‘स्मार्ट’ करण्यात विद्यार्थ्यांचाही असणार सहभाग 

पुण्याला  ‘स्मार्ट’ करण्यात विद्यार्थ्यांचाही असणार सहभाग 

Published On: Jan 17 2018 7:46PM | Last Updated: Jan 17 2018 7:46PM

बुकमार्क करा
पुणे : प्रतिनिधी 

स्वयंरोजगार संस्था आणि बचतगट, तसेच होतकरू व्यावसायिकांसाठी 'ओटा मार्केट' विकसित करण्यासाठी नाविन्यपूर्ण व सोयीस्कर डिझाईन तयार करण्याची स्पर्धा पुणे स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेडच्या वतीने आयोजित करण्यात आली आहे. वास्तुरचनाशास्त्र शिकणाऱ्या महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी स्मार्ट सिटीअंतर्गत निवडक जागांवर अनुरूप ओटा मार्केटच्या डिझाईनसाठी ही स्पर्धा घेण्यात येत आहे.

'ओपन आयडियाज्' ही स्पर्धा वास्तुरचनाशास्त्र शिकणाऱ्या महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी खुली आहे. औंध, बाणेर, बालेवाडी भागात सामाजिक सुविधा म्हणून ओटा मार्केट विकसित करण्यात येणार असून, यामध्ये हातगाडीवरून मालविक्री करणाऱ्या फेरीवाल्या विक्रेत्यांसाठीही सुविधा पुरविण्यासाठी सुनियोजित ओटा मार्केटची रचना अपेक्षित आहे. 
या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी वास्तुरचनाशास्त्र शाखेच्या विद्यार्थ्यांनी नोंदणी करून आपल्या डिझाईन सादर करायच्या आहेत. विद्यार्थ्यांनी १९ जानेवारीपर्यंत नोंदणी करणे अपेक्षित असून, डिझाईन सादर करण्याची अंतिम मुदत ९ फेब्रुवारीपर्यंत देण्यात आली आहे. या स्पर्धेची नोंदणी १२ जानेवारीपासून सुरू करण्यात आली आहे. स्पर्धेचा नोंदणी अर्ज आणि अधिक माहिती पुणे स्मार्ट सिटीच्या फेसबुक पेजवर उपलब्ध करून देण्यात आली आहे. -  https://goo.gl/yMPYRw

नाव नोंदणीसाठी स्पर्धकांनी आपले नाव, संपर्क, बोनाफाईड सर्टिफिकेट, मार्गदर्शकाचे नाव आणि माहिती projects@punesmartcity.in (प्रोजेक्ट्स अॅट पुणे स्मार्ट सिटी डॉट इन) या पत्त्यावर ईमेल करणे आवश्यक आहे. विद्यार्थ्यांनी ही माहिती आपल्या महाविद्यालयाच्या लेटरहेडवर प्राचार्यांच्या संमतीने पाठवायची आहे. नोंदणीनंतर ओटा मार्केटसंदर्भात अपेक्षित डिझाईबद्दलची संकल्पना स्पष्ट करण्यासाठी एक खास कार्यशाळा आयोजित करण्यात येणार आहे. 

या स्पर्धेतील विजेत्यास २० हजार रुपयांचे रोख बक्षीस देण्यात येणार आहे. तसेच, या डिझाईनची अंमलबजावणी करण्यासाठी पुणे महापालिकेच्या मान्यताप्राप्त वास्तुरचनाकारांसोबत काम करण्याची संधीही विजेत्या विद्यार्थ्यास देण्यात येणार आहे. तपशीलवार डिझाईन तयार करणे, अंदाजपत्रक आणि प्रकल्प पूर्ण करून त्याची अंमलबजावणी होईपर्यंत संबंधित विजेत्यास कामाची संधी मिळणार आहे. स्पर्धेत सहभागी होणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना पुणे स्मार्ट सिटीच्या वतीने प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. तसेच, दुसरा व तिसरा क्रमांक पटकावणाऱ्या विद्यार्थ्यांना उत्तेजनार्थ बक्षिसेही देण्यात येणार आहेत.